University Grants Commission : ऑनलाइन, दूरस्थ प्रवेशास आता मनाई; शिक्षणसंस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाचा दणका

१९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई केली आहे. देशभरातील विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमांसह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना यूजीसी परवानगी देते, पण अनेक संस्था मान्यतेविनाच अभ्यासक्रम राबवत असल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 23 Sep 2023
  • 01:46 pm

ऑनलाइन, दूरस्थ प्रवेशास आता मनाई

मान्यतेविनाच अभ्यासक्रम, शिक्षणसंस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाचा दणका, १९ अभ्यासक्रमांचा समावेश

यशपाल सोनकांबळे

मान्यतेविनाच अभ्यासक्रम ऑनलाईन आणि दूरस्थ अभ्यासक्रम चालविल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दणका दिला आहे. १९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई केली आहे. देशभरातील विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमांसह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना यूजीसी परवानगी देते, पण अनेक संस्था मान्यतेविनाच अभ्यासक्रम राबवत असल्याचे समोर आले आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि इतर पॅरामेडिकल अभ्यासक्रम, औषध निर्माणशास्त्र, नर्सिंग, दंतवैद्यक, वास्तुकला, विधी, कृषी, उद्यानविद्या, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, कलिनरी सायन्स, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, व्हिज्युअल आर्ट्स अँड स्पोर्ट्स, ॲव्हिएशन. योगा ॲण्ड टूरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांशिवाय पीएच डी व एम फिल हे अभ्यासक्रमही ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने करण्यास बंदी असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जुलै-ऑगस्ट २०२३ आणि जानेवारी-फेब्रुवारी २०२४ शैक्षणिक सत्रांसाठी खुल्या आणि दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांना मान्यता दिलेली नाही. तसेच आंध्र प्रदेशातील श्री वेंकटेश्वर विद्यापीठ आणि तामिळनाडूतील पेरियार विद्यापीठातील प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.  दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल, अशा सूचना यूजीसीच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी सांगितले कीसंबंधित अभ्यासक्रमांना मान्यता आहे की नाही याची खात्री केल्यानंतरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यूजीसी ऑनलाइन माध्यमांसह मुक्त आणि दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. मात्र अनेक शिक्षण संस्था संबंधित विद्यापीठांच्या मान्यतेशिवाय असे अभ्यासक्रम चालवतात. विद्यार्थ्यांना कोणतीही हमी न देता अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest