पुणे: पन्नास वर्षांनंतरही खुळेवाडी विकासापासून दूरच; हागणदारी मुक्ती योजना हवेत, स्मशानभूमी बनला जुगाऱ्यांचा अड्डा

पुणे: महापालिकेत समावेश होऊन पन्नास वर्षे उलटली तरी खुळेवाडीच्या नागरिकांना अजून विकासकामांची प्रतीक्षा आहे. येथील विकास कागदावर असून शासनाची हागणदारी मुक्ती योजनाही राबवलेली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 21 Sep 2024
  • 01:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सोमनाथ साळुंके

पुणे: महापालिकेत समावेश होऊन पन्नास वर्षे उलटली तरी खुळेवाडीच्या नागरिकांना अजून विकासकामांची प्रतीक्षा आहे. येथील विकास कागदावर असून शासनाची हागणदारी मुक्ती योजनाही  राबवलेली नाही.

पुणे-नगर महामार्गापासून दोन ते अडीच आणि खराडीपासून तीन- चार किमी अंतरावरील खुळेवाडीची लोकसंख्या अडीच ते तीन हजार आहे. गुरुव्दार आणि दादाची वस्तीसह खुळेवाडीचा पन्नास वर्षांपूर्वी पालिकेत समाविष्ट झाला. असे असूनही नागरिकांना वर्षभर विविध अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे पंधरा वर्षांपूर्वी एलआयसीच्या मोकळ्या जागेत तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून मृतदेहावर अंत्यविधीची सोय केली गेली. येथे पालिकेने दिवे बसविले नसल्याने रात्री अंधारात अंत्यसंस्कार करावे लागतात. येथील टवाळखोर स्मशानभूमीच्या आवारात जुगार खेळत असल्याने स्मशानभूमी कोणासाठी उभारली, असा प्रश्न पडतो. पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना दशक्रियेसाठी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ येते. तेथे बैठक व्यवस्था नसल्याने जमिनीवरच बसावे लागते. जुगार अड्ड्यापाठोपाठ तळीरामही या जागेचा मद्यप्राशनासाठी वापर करतात. येथे दारूच्या बाटल्या परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. 

केंद्र, राज्य सरकारकडून हागणदारी मुक्ती योजना राबविली जाते. पालिकेने याबाबतही येथे काही कामे केली नाहीत. अंतर्गत भागातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात येथून वाहनचालकांना सोडा पादचारी नागरिकांनाही जाणे अवघड होते. पालिकेने पावसाळी अथवा सांडपाणी वाहिनी टाकली नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहते. तसेच विजेच्या ताराही कमी उंचीवर असल्याने नागरिकांना धोक्यास सामोरे जावे लागू शकते. येथे पालिकेचे कचरा गोळा करणारे वाहन येत नसल्याने महिलांना कचरा रस्त्यावरच टाकावा लागतो. तसेच येथे बसची सुविधाही नसल्याने अनेकांना  पायी चालत जावे लागते. या संदर्भात पालिकेचे नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे अभियंता गोपाळ भोयर यांच्याशी संपर्क साधला असता हा भाग माझ्याकडे नसून परशुराम चोपडे यांच्याकडे असल्याचे  त्यांनी सांगितले. चोपडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पालिकेचे स्वीकृत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते विशाल साळी, गणेश भोकरे यांनी सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

पालिकेत समावेश होऊन पन्नास वर्षे झाली तरी आम्हाला विकासकामापासून वंचित राहावे लागत असेल तर ही दुर्दैवी बाब असल्याचे मत माजी नगरसेविका मंदाकिनी खुळे यांनी व्यक्त केले. समस्यांबाबत पालिकेकडून वारंवार पाठपुरावा करूनही विकासाबाबतीत पालिका उदासीन असल्याचा आरोप बंडूशेठ खांदवे यांनी केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest