संग्रहित छायाचित्र
जेईई, नीट आणि एमएच-सीईटीच्या पूर्वतयारीसाठी खासगी कोचिंग क्लासशी 'टाय-अप' असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाला पालकांकडून पहिली पसंती दिली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यामुळे अकरावी, बारावी वर्गात केवळ प्रात्यक्षिक परीक्षेपुरते हजर राहण्याची प्रथा पडली आहे. परिणामी दरवर्षीप्रमाणे महापालिका हद्दीबाहेरील शेकडोच्या संख्येतील क्लासच्या माध्यमातून 'टाय-अप' महाविद्यालयांमध्ये प्रवेश वाढत आहेत. या कारणांमुळे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (कॅप) होणाऱ्या अकरावी प्रवेशाच्या सुमारे ४२ हजार १८७ जागा रिक्त राहिल्या आहेत. तब्बल ३४.९२ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ३४३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण एक लाख २० हजार ८०५ जागांपैकी केवळ ६५.०८ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे ३४.९२ टक्के जागा रिक्त आहेत. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव आणि साहाय्यक शिक्षण संचालक डॉ. ज्योती परिहार यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशासाठी एक लाख तीन हजार ८३९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण एक लाख २० हजार ८०५ जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत ७८ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, तर सुमारे ४२ हजार १८७ जागा रिक्त आहेत.
या प्रक्रियेत सहभागी झालेल्या तब्बल १५ हजार ९४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे. 'कॅप'अंतर्गत एकूण एक लाख चार हजार १६० जागा रिक्त होत्या. या जागांवर ६९ हजार २१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. 'कॅप' फेरीतील ३४ हजार ९४२ जागा अद्याप रिक्त आहेत.
जागा रिक्त राहण्याची कारणे
-खासगी क्लासशी 'टाय-अप' असणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याला पसंती
-वर्गात हजेरीचा आग्रह नसणाऱ्या पालिका क्षेत्राबाहेरील कॉलेजना प्राधान्य
-कनिष्ठ महाविद्यालयांकडून अतिरिक्त तुकड्या, जागांना घेतलेली मान्यता
-अकरावीपेक्षा पदविका, आयटीआयकडे वाढता ओढा
कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिरिक्त तुकड्यांना मान्यता घेतल्या आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे. परिणामी रिक्त जागांची संख्याही तुलनेने अधिक दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा कल हा पदविका, आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडेही आहे. त्यामुळेही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील जागा रिक्त राहात आहेत.
- डॉ. ज्योती परिहार, साहाय्यक शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक कार्यालय (पुणे)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.