‘पुणे अमली पदार्थांचे केंद्र बनत असल्याचे नॅरेटिव्ह चुकीचे’
पुणे शहर व्यसनमुक्त करून शिस्तप्रिय बनविण्याचा प्रयत्न करणार आहे. जनतेचा विश्वास राहील असे काम करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. पुणे अमली पदार्थांचे केंद्र असल्याचे ‘नॅरेटिव्ह ‘ करून शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. पुणे शिक्षेचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि ती तशीच राहणार. पुण्यातून अमली पदार्थ हद्दपार करून शहराला शिस्तप्रिय बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.
पोलीस आयुक्तालय आणि निर्भय विद्यार्थी अभियानातर्फे ' जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ' महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील गेनबा मोझे विद्यालयात व्यसनमुक्ती पंधरवडा आयोजित केला होता. त्यावेळी पोलीस आयुक्त बोलत होते. अमितेश कुमार म्हणाले, " जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून प्रत्येकाने अमली पदार्थांचे सेवन करणार नाही, अशी शपथ घेऊ या . आपणच नाही तर आपले नातेवाईक,आजूबाजूचे नागरिक आणि मित्रांना व्यसनापासून रोखण्याची शपथ घेतली पाहिजे. वेळप्रसंगी सामाजिक संस्था आणि पोलिसांची मदत घ्या. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनामुळे लहान मुलांची गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी शाळांप्रमाणे वस्त्यांमध्ये अमली पदार्थविरोधी अभियान राबविणे गरजेचे आहे. “
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, मागील काही काळापासून अल्पवयीन मुलांमध्ये दारू आणि ड्रग घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी तरुणाई व्यसन करते. व्यसनामुळे काही काळानंतर मानसिक आजार आणि आरोग्याचे त्रास वाढत जातो. त्यामुळे मुलांनी कोणाच्या सांगण्यावरून अमली पदार्थांच्या सेवनाच्या आहारी जाऊ नये. “
यावेळी गेनबा मोझे संस्थेचे संस्थापक रामभाऊ मोझे, संचालिका प्रा. अलका पाटील, निर्भय अभियानचे सदस्य सुलभा क्षीरसागर, विजय शिवले, पौर्णिमा गादिया, निखिल गायकवाड उपस्थित होते. विवेक देव यांनी सूत्रसंचालन केले.
ड्रगची पाळेमुळे शोधा
दारू, सिगारेट आणि ड्रगचे सेवन करणारे अनेक रुग्ण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहेत. रुग्णाला विश्वासात घेऊन संस्थेने पोलिसांच्या मदतीने शहरात कोणी ड्रगची विक्री किंवा पुरवठा करतात याची माहिती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे पोलिसांनी यावर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवावी,अशी सूचना आयुक्तांनी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना केली.