संग्रहित छायाचित्र
पुणे : आयईईई स्मार्ट सिटीज टेक्निकल कम्युनिटीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारा ‘इमर्जिंग इकॉनॉमी - लेगसी सिटीज’ श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी केअर प्रोजेक्टला मिळाला आहे. आयईईई संस्थेच्या वतीने थायलंडमधील पटाया येथे २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२४ याकाळात झालेल्या आयईईई इंटरनॅशनल स्मार्ट सिटीज कॉन्फरन्समध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग असावा, तसेच महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा मोबाईल अॅप्लिकेशन आणि पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म पीएमसी केअर नव्या स्वरुपात विकसित करण्यात आला आहे. पीएमसी केअर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारी विविध माहिती देण्यात येत असते. यामध्ये प्रामुख्याने तक्रार निवारण, मालमत्ता करासह मनपाचे सर्व कर ऑनलाईन भरण्याची सुविधा, पाणी बंद सूचनेसह पुणे महापालिकेचे अपडेट्स, मनपाच्या नागरिकाभिमुख सेवांची माहिती, पुणे शहरातील घडामोडींविषयी अपडेट्स आसपासच्या सेवा-सुविधा आदींचा समावेश आहे. पुणे शहरातील लाखो नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यातच आता जागतिक स्तरावर देखील पीएमसी केअर प्लॅटफॉर्मची दखल घेण्यात आलीय.
जागतिक स्तरावरील संघटना
आईईई ही जागतिक स्तरावरील संघटना आहे. वेगवेगळ्या स्मार्ट सिटीमध्ये तेथील नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या टेक्निकल गोष्टींची इतर स्मार्ट सिटीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, यावर सातत्याने प्रकाश या संघटनेच्या माध्यमातून टाकण्यात येत असतो. याशिवाय स्मार्ट सिटींना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावर संस्थेच्या वतीने पुरस्कारही देण्यात येत असतात. नागरिकांना पीएमसी केअरवर पुणे महानगरपालिकेच्या सोयीसुविधांचा लाभ सहज घेता असल्याने आईईच्या वतीने ‘इमर्जिंग इकॉनॉमी - लेगसी सिटीज’ या श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन पुणे महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारासाठी जगभरातून प्रवेशिका आल्या होत्या. यासर्वांमध्ये पीएमसी केअर प्लॅटफॉर्मने बाजी मारली आहे.
महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले, मा. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, मा. उप आयुक्त संजय शिंदे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम मॅनेजर मा.राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमसी केअर टीमचे काम सुरू असून जागतिक स्तरावर पीएमसी केअरचा गौरव झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.
पीएमसी केअरवर नागरिकांना लाभ घेता येणाऱ्या प्रमुख सेवा:
• तक्रार निवारण
• मालमत्ता करासह मनपाचे सर्व कर ऑनलाईन भरण्याची सुविधा
• पाणी बंद सूचनेसह पुणे महापालिकेचे अपडेट्स
• मनपाच्या नागरिकाभिमुख सेवांची माहिती
• पुणे शहरातील घडामोडींविषयी अपडेट्स
• तुमच्या आसपासच्या सेवा-सुविधा