संग्रहित छायाचित्र
पुण्यातील प्रसिद्ध गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संस्थेला राजीनामा लिहित तात्काळ पद सोडण्याचा निर्णय रानडे यांनी घेतला आहे. वैयक्तिक कारणामुळे अजित रानडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.
डॉ. अजित रानडे हे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू होते. त्यांच्या कुलगुरू पदासाठीच्या पात्र-अपात्रतेचा मुद्दा बराच गाजला होता. डॉ. रानडे यांच्याकडे कुलगुरू पदासाठी आवश्यक पात्रता नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी याबाबत खुलासा करण्यासाठी एक समितिची स्थापना केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार डॉ. रानडे यांची नियक्ती रद्द करण्यात आली होती.
डॉ. रानडे यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. दरम्यान, डॉ. देबराय यांनी कुलपतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संजीव सन्याल यांची कुलपती पदी नियुक्ती झाली. त्यांनी डॉ. रानडे यांच्यावरील कारवाईचे पत्र मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. रानडे यांनी आपला राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.