संग्रहित छायाचित्र
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात उमेदवारी न मिळालेल्या नाराजांनी बंडखोरी करण्यासाठी दंड थोपटले आहेत. अनेकांनी तर आपापल्या मतदार संघात ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा निर्धार केला आहे. पुण्यातील ‘पर्वती’ मतदार संघात देखील ‘सांगली पॅटर्न’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मतदार संघात ठिकठिकाणी ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून हे फलक ‘महायुती’ आणि ‘महाविकास आघाडी’ यांच्यातील नेमके कोणी लावले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपाच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. त्या सलग तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. भाजपामधील उमेदवारीवरून खेचाखेची झाली. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने मिसाळ यांना उमेदवारी घोषित केली. भिमाले यांची नाराजी दूर करण्यात पक्ष यशस्वी झाली. यासोबतच महाविकास आघाडीमध्ये देखील उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. कॉँग्रेसचे माजी गटनेते आबा बागूल यांनी यंदाही उमेदवारी मागितली होती. तसेच, शिवसेनेचे (उबाठा) बाळासाहेब ओसवाल, सचिन तावरे देखील इच्छुक होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून (शरडचंद्र पवार) स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी उमेदवारी मागितली होती.
कदम यांनी २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिसाळ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पर्वतीची जागा महाविकास आघाडीत यंदाही राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने कदम यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कदम यांनी कंबर कसली असून प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अद्याप आबा बागूल हे नाराज आहेत. त्यांनी २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील बागूल यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्ष नेत्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला होता. यावेळी देखील त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. परंतु, ते अर्ज मागे घेतात की अपक्ष लढतात याकडे लक्ष लागले आहे.
पर्वतीमध्ये आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादीच्या (शप) अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होणार की बागूल माघार घेणार याबाबतचे चित्र ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. मात्र, याच धामधुमीत संपूर्ण मतदार संघात ठिकठिकाणी ‘पर्वतीत आता सांगली पॅटर्न’ असे फलक लागले आहेत. हे फलक नेमक्या कोणत्या नाराजाने लावलेत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाविकास आघाडीत देखील नाराज आहेत आणि महायुतीमध्ये देखील काही नाराज आहेत. त्यामुळे हा ‘पॅटर्न’ नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालाअंती स्पष्ट होईल.
पर्वती मतदार संघात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगली होती. त्याच स्पर्धेमधून ‘आपलं ठरलंय... यंदा विधानसभेत एक मराठा लाख मराठा’ अशा आशयाचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते. हे फलक नेमके लावले कोणी अशी चर्चा मतदार संघात रंगली होती. जातीचा आधार घेऊन उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा नेमका कोणी प्रयत्न केला हे अद्याप अनुत्तरीत आहे.