उपकार नको संधी हवी; अपंगत्वावर मात करीत जिद्दीने जगणाऱ्या तरुणाची सकारात्मक कहाणी
आयुष्यात येणारी संकटे आणि अडचणींसमोर हात टेकलेले अनेकजण नैराश्यात गेल्याची उदाहरणे आपल्या आसपास घडत असतात. भल्याभल्या व्यक्तीदेखील एखाद्या अपयशाने खचून जातात किंवा आयुष्याला दोष देतात. परंतु, अशा नैराश्यात आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर संकटांवर मात करीत आपल्या यशोगाथा लिहिणारी माणसंदेखील असतात. अशीच एक संघर्ष गाथा गिरीश पाटेकर या तरुणाच्या रूपाने समोर आली आहे. गिरीशने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर अपंगत्वावर मात करीत आपल्या रोजगाराचा मार्ग शोधला आणि जगण्यातला स्वाभिमान जपत अन्य दिव्यांग व्यक्तींसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे.
गिरीश स्वारगेटजवळील मुकुंदनगरमध्ये असलेल्या स्वास्थ्य सदन रुग्णालयाजवळ राहण्यास आहे. अन्य सामान्य मुलांसारखेच त्याचे आयुष्य होते. लहान वयात खेळणे-बागडणे, किशोर वयातील मित्रांसोबतची अल्लड मैत्री आणि मौजमजा, तरूणपणातील अवखळ वागणे सर्व काही अगदी नॉर्मल होते. २०१८ मध्ये त्याच्या आयुष्यात एक वादळ आले. त्याला मणक्याचा विकार जडला. त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करावी लागली. दुर्दैवाने या शस्त्रक्रियेदरम्यान त्याला अपंगत्व आले. शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे कंबरेखालील भागाच्या संवेदनाच नष्ट झाल्या. कंबरेखाली शरीर आहे की नाही, याची जाणीवच निघून गेली. स्वच्छंदीपणे आपल्या मित्र मंडळींमध्ये बागडणाऱ्या गिरीशच्या हालचालींना मर्यादा आल्या. तो अन्य मुलांसारखा चालू-फिरू शकत नव्हता. शारीरिक हालचालींवरदेखील मर्यादा आल्या. अचानक अपंगत्व आल्याने अंथरुणावर खिळून राहण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय उरला नव्हता. आपल्या काळजाचा तुकडा असा अंथरुणावर खिळलेला पाहून आईचे काळीज तुटत होते. आईने आपले दु:ख आणि भावनांना बांध घालून मुलाची सुश्रूषा करण्यास सुरुवात केली. भाऊ नितीनदेखील पत्नीच्या मदतीने समर्पित भावनेने त्याची देखभाल करीत होता.
स्वत:ची स्थिती पाहून गिरीश खचून गेला. अनेकदा त्याच्या भावनांचा बांध फुटत होता. त्याचे अश्रू पाहून कुटुंबीयदेखील दु:खी होत असत. त्याला नैराश्य येऊ लागले. त्याची आई गृहिणी असून भाऊ एका बँकेत नोकरी करतो. गिरीशची वहिनी आणि पुतण्यादेखील तेवढ्याच आत्मियतेने त्याचे सर्व करीत होते. कोणीही कधीही कसलीही तक्रार केली नाही. मनाने खचलेल्या गिरीशला उभारी देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्याची सकारात्मकता वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते. याच काळात त्याचे मित्रदेखील त्याला धीर देत होते. त्याच्याशी संवाद ठेवून होते. कोणीही त्याची मैत्री तोडली नाही. तब्बल चार वर्षे तो घरात झोपून होता. हळूहळू त्याने या नैराश्यामधून बाहेर पडायचे ठरवले. परिस्थितीशी दोन हात करण्याचे ठरवले. त्याने मित्रांजवळ आणि कुटुंबियांजवळ ‘‘मला असे परावलंबी आयुष्य नको. मला काही तरी करून दाखवायचे आहे,’’ अशी जिद्द बोलून दाखवली.
गिरीशच्या इच्छा शक्तीला एका सामाजिक संस्थेने बळ द्यायचे ठरवले. त्याला मदत केली ती सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सोनाली तळेकर यांनी. त्या काम करीत असलेल्या संस्थेकडे गिरीशबाबत विचारणा केली. या संस्थेने गिरीशला खास अपंगांसाठी बनवलेली इलेक्ट्रिक गाडी दिली. या गाडीच्या रूपाने त्याच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले होते. अपंगत्त्व आलेल्या आणि व्यवसाय करण्याची तयारी असलेल्या वीस व्यक्तींना या संस्थेने मोफत इलेक्ट्रिक वाहने दिली होती. गिरीशदेखील त्यातील एक होता. गिरीशला या संस्थेच्या माध्यमातून एका ‘फूड डिलिव्हरी’ अॅपमध्ये ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम मिळाले. या कामासाठी त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
तब्बल सात वर्षांनंतर गिरीश घराबाहेर पडला होता. सात वर्षात तो चालला नव्हता. आपण, पुन्हा इतरांप्रमाणे बाहेर पडू की नाही याबाबत साशंक होता. मात्र, त्याने जिद्द धरली. ‘‘आपल्याला स्वाभिमानाने जगता यायला हवे. आपला भार कोणाला वाटता कामा नये,’’ अशी भावना त्याच्या मनात होती. ‘‘उपकार नकोत... तर संधी हवी,’’ असे तो म्हणायचा. त्याला रोजगाराची संधी आली आणि ती स्वीकारत त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले. ऑगस्ट २०२४ पासून त्याने ‘फूड डिलिव्हरी’चे काम करण्यास सुरुवात केली. त्याला त्यामधून रोजगार प्राप्त झाला. याबाबत गिरीश म्हणतो, ‘‘मला आता खूप फ्रेश वाटतंय. मी नैराश्यात गेलो होतो. माझी आई, भाऊ, वहिनी, पुतण्या, मित्र यांनी खूप धीर दिला. मला अगदी लहान मुलाप्रमाणे सांभाळले. त्यांनी दिलेल्या सकारात्मक उर्जेमुळे मी पुन्हा बाहेर पडलो. माझी धडपड संस्थेने पाहिली आणि मदत केली. या सर्वांमुळे आज स्वकष्टाच्या कमाईपर्यंत मी येऊ शकलो, याचा खूप आनंद वाटतो.’’
मागील सहा महिन्यात गिरीशने कधीही ‘आळस आलाय... काम जास्त आहे... आज फार थकलो... झोप पूर्ण झाली नाही...’ अशी कोणतीही कारणे न देता जिद्दीने आपले काम चोख बजावले आहे. बेकार हिंडणाऱ्या नाकी-डोळी नीट, धडधाकट हातपाय असलेल्या तरुणांना चपराक दिली आहे. टवाळक्या करीत हिंडण्यापेक्षा जिद्दीने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा त्याचा ध्यास अचंबित करणारा आहे. दिव्यांग असलेल्या गिरीशने सर्वांसमोर इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो, हे सिद्ध केले आहे.