संग्रहित छायाचित्र
'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठात एकीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ७५ ग्रॅमची १००० हून जास्त चांदीच्या नाण्यांचे वाटप केले गेले, तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे राज्याच्या दुष्काळी भागातील गरीब विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाच्या नावावर अत्यल्प फराळ दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. कुलगुरू, प्र कुलगुरू आणि कुलसचिवांच्या उपस्थितीत दिवाळी सुट्ट्यांमध्ये हॉस्टेलवर राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा केल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्या उपस्थितीत दिवाळी फराळ वाटपाची औपचारिकता पार पाडण्यात आली. दिवाळी सुट्ट्या, दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक टंचाईमुळे नाईलाजास्तव मुला-मुलींच्या हॉस्टेलवर राहावे लागते.त्यांना मायेचा हात देत कुटुंबीयांची आठवण येऊ नये, यासाठी दरवर्षी आत्मीयतेने कुठलाही गाजावाजा न करता दिवाळी फराळाचा कार्यक्रम केला जातो. परंतु यंदाच्या वर्षी कुलगुरू, प्र- कुलगुरू आणि कुलसचिवांच्या उपस्थितीत अत्यल्प फराळ देत गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा केल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
पीएच.डी संशोधक विद्यार्थी म्हणाले की, दिवाळी सण असून आम्ही विद्यापीठ हॉस्टेलवर राहतो. त्यांमागे आमची आर्थिक अडचण आहे. तसेच गावी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात. अनेक विद्यार्थ्यांचे माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थी घरी सण साजरा करू शकत नाहीत. दरवर्षी दिवाळी फराळ वाटपांचा कार्यक्रम हा कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या उपस्थितीत खेळी-मेळीच्या वातावरणात होतो. परंतु यंदाच्या वर्षी अत्यल्प फराळ दिला गेला, तसेच काही विद्यार्थ्यांना तर हा फराळ मिळालेलाही नाही. त्यामुळे फराळ वाटपात घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिवांनी आमच्या गरिबीची चेष्टा केली आहे. एकीकडे चांदीची नाणी वाटताना दौलतजादा केली जाते. परंतु विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ देताना मात्र कंजुषी केली जाते. हे कुलगुरूंसह सर्वांच्या कोत्या मनाचे उदाहरण आहे.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला असणारे विद्यार्थी सिद्धांत जांभूळकर म्हणाले की, जणुकाही आम्हाला दिवाळी फराळ खायला मिळत नाही, असे समजून कुलगुरू, प्र- कुलगुरू आंणि कुलसचिवांनी अत्यंत तुटपुंज्या स्वरूपात दिवाळी फराळ देऊन सर्वांची थट्टा केली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना तर फराळ पाकिटे मिळालीच नाही. दिवाळी फराळ वाटपात घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. चांदीची नाणी बनवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला. परंतु विद्यार्थ्यांना फराळ देताना मात्र हात आखडता घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
एकीकडे विद्यापीठ प्रशासनाकडून हजारो चांदीची नाणी बनवण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो, तर दुसरीकडे गरीब विद्यार्थी जे त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव घरी सण साजरा करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यांना तुटपुंज्या स्वरूपात दिवाळी फराळ देऊन त्यांच्या गरिबीची चेष्टा केली जाते. दिवाळी फराळ खाल्ला नाही तर काही फरक पडणार नाही. परंतु उपकार केल्यासारखे फराळ वाटपाची केवळ औपचारिकता केली गेली.
असंवेदनशील कुलगुरू, प्र- कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासह विद्यापीठ प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि पीएच.डी संशोधक राहुल ससाणे यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक अभिजीत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.