संग्रहित छायाचित्र
पुणे - ३ नोव्हेंबर रोजी रात्री १०.२० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्ष येथे वानवडी, विकास नगर, कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत भाऊ व बहिण दरवाजा लॉक होऊन अडकले असल्याची वर्दि मिळताच तातडीने बीटी कवडे रस्ता व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.
घटनास्थळी जवान पोहोचताच तिथे उपस्थित पोलिस कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतली असता, सदनिकेत भाऊ (वय १९) व बहिण (वय २४) हे आतमध्ये स्वतः घरगुती कारणानिमित्त मानसिक विंवचनेत असून जीवाचे बरे वाईट करण्याचे सांगत आहेत. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी क्षणाचा ही विलंब न करता अग्निशमन उपकरण डोअर ब्रेकर, कटावणी, पहार यांच्या साह्याने सुमारे दहा मिनिटातच सदनिकेचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्याचवेळी दोघे ही जण बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहताच जवानांनी तातडीने अग्निशमन दलाच्या वाहनातूनच जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जवानांनी डॉक्टर यांच्याकडे त्या दोघांविषयी चौकशी केली असता, डॉक्टरांनी या दोघांना अगदी वेळेत उपचाराकरिता दाखल केल्याने यांचे प्राण वाचले असून सद्यस्थितीत दोघे ही लवकरच बरे होतील असे सांगण्यात आले. दिवाळी सणात भाऊबीजेच्या दिवशी उचित वेळेत केलेली कामगिरी भाऊ व बहिणेचे प्राण वाचवू शकली हे जवानांना समाधान देणारे होते.
सदर घटनेत वाहनचालक दत्ता अडाळगे, सत्यम चौंखडे तसेच जवान सुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, श्रेयस मेटे, महेश पांडे, सुरज हुलवान, हर्षवर्धन खाडे, अनुराग पाटील, रितेश मोरे यांनी सहभाग घेतला.