मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर; म्हणाले पाणी सोडण्याआधी पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं

पुणे: संततधार पावसामुळे गुरुवारी पुणे शहराची अक्षरश: दाणादाण उडाली. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीत पाणी सोडल्याने पुण्याच्या सखल भागात पूर आला. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Fri, 26 Jul 2024
  • 03:05 pm
Pune Flood, Murlidhar Mohol

संग्रहित छायाचित्र

पुणे: संततधार पावसामुळे गुरुवारी पुणे शहराची अक्षरश: दाणादाण उडाली. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीत पाणी सोडल्याने पुण्याच्या सखल भागात पूर आला. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. याबाबत ना नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली ना तशी घोषणा करण्यात आली. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनावर या पुराचं खापर फोडलंय.  या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. 

मुसळधार पावसामुळे स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्याच्या विकासाची लक्तरे वेशीवर टांगली गेली.  यामुळे अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झालं आहे.  स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या बाणेर, बालेवाडीसह सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, येरवडा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आदी भागाला पावसाचा मोठा तडाखा बसला. तसेच  डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्र तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. परिणामी खडकवासला, पवना या धरणातून पाणी सोडण्यात आलं. यामुळे पुणे शहर आणि परिसरात जलमय स्थिती झाली. मुळा तसेच मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या सर्व सोसायटी, वसाहतींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराची मदत घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी पहाटे ३५ हजार क्युसेक पाणी येत असल्याची माहिती दिली होती. मात्र जर ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता, असं म्हणत याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळं शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये जलसंपदा खात्याचं प्रशासन आणि महापालिकेचं प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभाव दिसून आला. जर तुम्ही ५५ हजार क्युसेक पाणी सोडणार होतात तर त्याची माहिती देणे अपेक्षित होतं. लोकांना सावध करणं अपेक्षित होतं. हे कुठल्याही प्रकारे खपवून घेतलं जाणार नाही. याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू. परंतु आता जे जनजीवन विस्कळीत झालं आहे, ते सुरळीत करण्याला पहिलं प्राधान्य असेल. 

मोहोळ पुढे म्हणाले, मला सकाळी ५० ते ५५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली होती. जर ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. याची नक्की चौकशी होईल. मात्र आता ती वेळ नाहीये. झालेली परिस्थिती सुधारण्याची ही वेळ असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest