वडगावशेरीत पाण्यासाठी वणवण; कमी दाबाने, घाण पाणी येत असल्याने नागरिक त्रासले

भामा आसखेड धरणातून वडगाव शेरीला पाणीपुरवठा केला जात आहे. मोठा गाजावाजा करत राजकीय नेत्यांनी धरणातून पाणी आणल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वडगाव शेरीचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असा दावा केला गेला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Thu, 17 Oct 2024
  • 12:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

वडगावशेरीत पाण्यासाठी वणवण; कमी दाबाने, घाण पाणी येत असल्याने नागरिक त्रासले

भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होत असून शेवटच्या घटकांना पाणी देण्यास महापालिकेला अपयश

भामा आसखेड धरणातून वडगाव शेरीला पाणीपुरवठा केला जात आहे. मोठा गाजावाजा करत राजकीय नेत्यांनी धरणातून पाणी आणल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वडगाव शेरीचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असा दावा केला गेला. परंतु पुणे महापालिकेला या भागातील शेवटच्या घटकापर्यंत पाणीपुरवठा करण्यास अपयश आले आहे.

अपुरा पाणीपुरवठा, घाण पाणी आणि कमी दाबाने येत असलेले पाणी यामुळे येथील नागरिक त्रासले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

वडगाव शेरी भागात  झपाट्याने विकसित झाला आहे. या भागात उच्चभ्रू सोसायट्या उभ्या राहिल्या आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे भामा आसखेड धरणासह लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. असा दाखला देत आमदार, नगरसेवकांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. तसेच हाच मुद्दा आता विधानसभेच्या निवडणुकीतदेखील पुढे केला जाणार आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात पाणी येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साईनाथनगरमधील राजमुद्रा चौक, अष्टविनायक चौक, वाढेश्वर नगर, राजश्री कॉलनी, मुनुरवार सोसायटी, ओम गंगोत्री सोसायटी, व्यंकटेश कृपा सोसायटी, बाजीराव नगर या भागामध्ये गेल्या २० दिवसापासून घाण पाण्यासह कमी दाबाने पाणीपुरवठा होता आहे.  तसेच घरकुल सोसायटी, महादेव नगर, सिद्धेश्वरनगर या ठिकाणी सहा महिन्यांपासून पाणी येत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

येथील नागरिकांचा पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतची तक्रार नागरिकांनी अनेकवेळा पुणे महापालिकेकडे केली. परंतु पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उडवाउडवाची उत्तरे देत वेळ मारून नेतात, असे नागरिकांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना सांगितले. वडगाव शेरी परिसरातील नागरिकांनी ही समस्या सोडवण्यात यावी, यासाठी पुन्हा एकदा महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.

आता पाणीपुरवठा विभागाने २ ते ३ लाख लिटर पाणी वाढवून देण्याचे आश्वासन दिले आहे. असे असले तरी, ऐन निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्न तापल्याने याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वडगावशेरी भागात पाण्याची प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे महापालिकेच्या उदासीन अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. भामा आसखेड आणि लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा होत असला तरी नागरिकांपर्यंत पाणी पोहोचत नाही. अधिकाऱ्यांना विचारले असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. घाण पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- संदीप जऱ्हाड, माजी नगरसेवक

वडगाव शेरीतील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पॉकेटमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका चित्रपट गृहाजवळील पाण्याची टाकी सुरु केली जाणार आहे. या भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो.  मात्र शेवटच्या सोसायट्यांपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. महापालिका कर्मचाऱ्यांना या भागात पाहणी करण्याची सूचना केली आहे. लवकर पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

वडगाव शेरी भागात सुमारे तीन लाख नागरिक राहतात. लोकसंख्येचा विचार करुन भामा आसखेड धरणाचे ३५ दशलक्ष लिटर आणि लष्कर जलकेंद्रातून १५ दशलक्ष लिटर असा एकूण ४५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. घरकुल सोसायटीमध्ये पाण्याची समस्या आहे, ती सोडवली जाईल. सध्या केला जाणारा पाण्याचा पुरवठा हा सव्वा तीन लाख लोकांना पुरेल इतका आहे. त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांची तक्रारी आहेत, त्या सोडविल्या जातील.
- इंद्रभान रणदिवे, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest