पूर ओसरल्यानंतर पुण्यात चिखलाचं साम्राज्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले 'डीप क्लीन' मोहिम राबविण्याचे निर्देश

पुण्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 26 Jul 2024
  • 05:09 pm
Chief Minister Eknath Shinde, Pune, Heavy Rain, Deep Clean Campaign in Pune

संग्रहित छायाचित्र

पुण्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पूरग्रस्त भागातील घरामध्ये चिखल शिरला असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला 'डीप क्लीन' मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest