पुण्यातील एमएसईआरटीतर्फे राज्यातील शाळांचे लवकरच मूल्यमापन !
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अनुसरून शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक राज्याने शाळा गुणवत्ता मूल्यांकनाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी निकष निर्मितीचा आराखडा तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSERT) पुणे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून शाळा गुणवत्ता मानके आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी राज्यभरातील तज्ज्ञांची निवड केली आहे. राज्यस्तरीय कार्यशाळेत एमएससीईआरटीचे संचालक डॉ. अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, संकीर्ण विभाग प्रमुख राजेंद्र वाकडे, शिक्षणतज्ज्ञ माजी प्राचार्य डॉ. ह. ना. जगताप, विद्या समीक्षा केंद्राचे राज्य समन्वयक आसिफ शेख यांनी मार्गदर्शन केले. २०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. धोरणात शाळा मूल्यांकनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. धोरणातील शालेय शिक्षणात मुद्दा क्रमांक आठमध्ये शालेय शिक्षणासाठी मानके ठरवणे आणि अधिस्विकृती या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजाणीसाठी मानके तयार करण्यासाठी एमएससीईआरटी येथे वर्षभरामध्ये विविध कार्यशाळा होणार आहेत. त्यासाठी मूल्यांकनाचे ज्ञान व अनुभव असणाऱ्या तसेच शाळासिद्धीची माहिती असणाऱ्या राज्यभरातील तज्ज्ञांची निवड केली आहे. या तज्ज्ञांच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा एमएससीईआरटी पुणेच्या तीन कार्यशाळा झाल्या आहेत. पायलट प्रोजेक्ट राबवणार
अंतिम कार्यशाळा नोव्हेंबरअखेर होणार असून त्यानंतर पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.