रस्त्यावर जेवण बनवले, कष्टाने घरे बांधली, आज उद्ध्वस्त झाली; रहिवाशांचा टाहो
“आम्ही रस्त्यावर जेवण बनून खात होते. खूप कष्टाने घर बांधले आहे. आम्ही सांहेबांच्या पाया पडलो, विनवणी केली. मात्र, त्यांनी आमच्या घरावर कारवाई केली. ही जागा अनाधिकृत आहे, घर बांधू नका, हे आम्हाला घर बांधण्याच्या अधिच सांगितले असते, तर आम्ही बांधले नसते. आम्हाला त्यावेळी मारहाण केली असती तरी चालली असती. मात्र, आता कष्टाने बांधलेल्या घरावर कारवाई केली आहे”, असा शब्दात अनाधिकृत बांधकामावरील कारवाईदरम्यान नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने उत्तमनगरमधील शिवणे येथील देशमुखवाडीतील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन इमारती महापालिकेकडून पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यावेळी नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता महापालिकेकडून कारवाई कऱण्यात येत आहे, असा आरोपही नागरिकांनी यावेळी केला आहे. याशिवाय कारवाई अडवण्याचा देखील नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी धरून त्यांना बाजूला केले.
यावेळी रहिवाशांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “आम्ही आयुष्याचं सर्वस्व लावून घरे बांधली आहेत. पण त्याचा आता सगळा नायनाट होताना दिसत आहे. आमचा प्रशासनाला एकच सवाल आहे की जेव्हा नागरिक घरे बांधत होती तेव्हा तुम्ही झोपले होते का? जेव्हा एक घर बांधलं, तेव्हाचं ते पाडलं असतं तर इतरांनी घरे बांधली नसती. आता सगळ उभं झाल्यानंतर तुम्ही आमचा संसार उद्ध्वस्त का करत आहात?” असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत महापालिका अधिकारी निवृत्ती उतळे म्हणाले की, “पुर्वी या लोकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. बांधकामे थांबवण्यास सांगण्यात आले होते. काही बांधकामे थांबवली देखील होती. मात्र, नोटीसीला उत्तर न देता नागरिकांनी घरे बांधली. तीन-तीन मजले वर चढवली. लोकांना सुचना करूनही ते थांबले नाहीत. त्यामुळे शिवणे परिसरातील बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.