Pune Traffic : पुढील २० वर्षांचा विचार करून ‘ट्राफिक’चा ‘मास्टर प्लान’

पुण्याची पुढील वीस वर्षांची वाढ लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांकडून (Pune City Police) वाहतुकीसंदर्भात सविस्तर ‘प्लॅन’ तयार केला जात आहे. पुण्याची भविष्यकालीन वाढ, प्रामुख्याने वाढत चाललेले भाग, संभाव्य वाहन संख्या याबाबत विचार करून शासनाला हा अहवाल सादर केला जाणार आहे.

Pune Traffic

पुढील २० वर्षांचा विचार करून ‘ट्राफिक’चा ‘मास्टर प्लान’

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती : ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा देखील वापर

पुणे : पुण्याची पुढील वीस वर्षांची वाढ लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांकडून (Pune City Police)  वाहतुकीसंदर्भात सविस्तर ‘प्लॅन’ तयार केला जात आहे. पुण्याची भविष्यकालीन वाढ, प्रामुख्याने वाढत चाललेले भाग, संभाव्य वाहन संख्या याबाबत विचार करून शासनाला हा अहवाल सादर केला जाणार आहे. शहराच्या वाहतुकीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन नियोजन अशा दोन स्वरूपात काम केले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी ‘मिरर’शी बोलताना दिली. शहराची वाहतूक सुधारण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा (Artificial Intelligence) देखील वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Pune Traffic)

दीर्घ कालीन उपाययोजना करण्यासाठी ‘इंटीग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ तयार करून शासनाला पाठविण्यात येणार आहे. शहरात एकूण ७५० प्रमुख चौक (जंक्शन) आहेत. यामधील केवळ ३०० ठिकाणी सिग्नल आहेत. तर, त्यातील १०० सिग्नल स्वयंचलित आहेत. आगामी काळात वाढते पुणे लक्षात घेता या जंक्शनची संख्या ८०० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी ‘लेजर’ आणि ‘रडार’वर आधारीत सिग्नल व्यवस्था लावणे आवश्यक आहे. याठिकाणावरील वाहतूक, वाहनांची संख्या, कोणत्या वेळांमध्ये अधिक वाहतूक असते आदींची माहिती या सिस्टीममधून स्वयंचलितरित्या (ऑटोमेटेड) होईल. त्यानुसार सिग्नल व्यवस्था काम करेल. जर रस्त्यावर वाहने नसतील तर एखाद्याला लाल सिग्नलला थांबण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचा सिग्नल आपोआप हिरवा होईल. कॅमेरा सिस्टीमद्वारे ही व्यवस्था काम करेल. यासोबतच सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विरुद्ध बाजूने येणे, सीट बेल्ट न घालणे आदी वाहतूक नियमभंगाच्या कारवाया कॅमेऱ्याद्वारेच होतील. 

नुकतीच शहारातील सर्व प्रमुख यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पीएमआरडीए, मेट्रो, स्मार्ट सिटी आदी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात अशा दोन बैठका झाल्या आहेत. शहराच्या वाहतूक समस्ये विषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.  तातडीच्या उपाययोजना करून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये अशास्त्रीय गतीरोधक काढणे, इंडियन रोड कॉँग्रेसच्या निकषानुसार नवे गतीरोधक तयार करणे, दभाजकांना असलेले पंक्चर काढणे, कोंडीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे शोधून उपाययोजना करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. आम्ही शहारातील जड वाहने बंद केले आहेत. यासोबतच ट्राफिक वॉर्डन ट्रेनिंग सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिसांना ४५० ट्राफिक वॉर्डन मिळाले आहेत. ही संख्या १००० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. 

वाहतूक पोलिसांना देखील कारवाई आणि नियमन याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. वाहतूक अधिक असताना नियमन आणि अन्य वेळेत दंडात्मक कारवाई असे स्वरूप ठेवण्यात आले आहे. शहरात पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. जर एखाद्या इमारतीच्या बांधकाम मंजुरीच्या प्लॅनमध्ये पार्किंग असेल आणि त्याठिकाणी अन्य व्यवसाय किंवा पार्किंग वापरात नसल्याचे आढळून आल्यास ‘एमआरटीपी’ कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. वाहन चालकांना पार्किंग देण्याबाबत देखील या बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

वाहतूक सुधारणेच्या पहिल्या टप्प्यात १५ रस्ते निवडण्यात आले आहेत. यामध्ये नेमक्या काय सुधारणा करायच्या बाबत अहवाल तयार केला जाणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार हे प्रामुख्याने त्यावर काम करीत आहेत. या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणांची पाहणी सुरू केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest