Maratha Reservation Protest: मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणीकंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Maratha Reservation Protest in Pune

संग्रहित छायाचित्र

मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लोणीकंद आणि हडपसर पोलिसांची कारवाई

लक्ष्मण मोरे
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणीकंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Maratha Reservation)

प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याचा आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणल्याचा ठपका कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maratha Reservation Protest in Pune)

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शनी शिंगारे, योगेश बरडे, ओंकार तुपे, ज्योती सातव (सर्व रा. वाघोली)  यांच्यासह ४० जणांवर भादंवि १४३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शंकर महादू क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या नियमांमध्ये सगेसोयरे हा शब्द टाकण्यासाठी तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण देण्यासाठी रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, लोहगाव-वाघोली रस्त्यावर असलेल्या समाज मंदिरात आणि वाघोली गावठाणात सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास आंदोलन करण्यात आले होते. या सर्व कार्यकर्त्यांनी बेकायदा जमाव जमा केला.

२० फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सीआरपीसी कलम १४४ अन्वये हे आदेश काढण्यात आलेले आहेत. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल अशा पद्धतीने वर्तन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीदेखील या आदेशाचा भंग आणि उल्लंघन करीत आंदोलन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात संदीप लहाणे पाटील, महेश टेळे पाटील, बाळासाहेब भिसे, अनिल बोटे, कुणाल मोरे, विजय भाडळे, रमेश तुपे यांच्यासह १५ जणांवर भादंवि १४३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार दिनेश विठ्ठल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. मराठा समाजाच्या या सर्व कार्यकर्त्यांनी  पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या हडपसरजवळील १५ नंबर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे ऐकून न घेता जोरजोरात घोषणा दिल्याचे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest