Pune News: 'विद्या' पडलीय धूळखात; बालभारतीच्या लाखो स्वाध्याय पुस्तिका गोदामात पडून

पुणे: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) विविध विषयातील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर परवडेल अशा किमतीत

Balbharti

'विद्या' पडलीय धूळखात...

खासगी प्रकाशकांना कोट्यवधींचा फायदा होण्यासाठी पुस्तके गोदामातच ठेवल्याचा गंभीर आरोप

पुणे: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) विविध विषयातील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर परवडेल अशा किमतीत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार लाखो स्वाध्याय पुस्तिका छापून तयार ठेवल्या आहेत. तब्बल २५ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या पुस्तिका राज्यातील विविध गोदामांमध्ये धूळखात पडून आहेत. (Balbharati News)

खासगी प्रकाशकांच्या महागड्या गाईडच्या विक्रीतून आर्थिक फायदा व्हावा, यासाठी या पुस्तिका बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करत नसल्याचा गंभीर आरोप पालक, शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. 

दरम्यान, बालभारतीच्या संचालकांनी २६ मे २०२२ रोजी एक परिपत्रक निर्गमित करून पाठ्यपुस्तक मंडळाने नव्याने प्रकाशित केलेल्या स्वाध्याय पुस्तिका व प्रात्यक्षिक नोंदवहीबाबत तसेच ई-बालभारती या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून बालभारतीमार्फत नव्याने प्रकाशित होणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका व प्रात्यक्षिक नोंदवहीची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात आली होती. (Balbharti Textbook News)

उपरोक्त संदर्भीय पत्रामुळे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पाठ्यपुस्तक मंडळाने आठवी ते बारावीसाठी मराठी-इंग्रजी माध्यमांच्या स्वाध्याय पुस्तिका नव्याने प्रकाशित करण्यास मान्यता दिली होती. विशेष म्हणजे, सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिकेचे प्रात्यक्षिक नोंदवही निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने मान्यतादेखील दिली आहे. परंतु लाखो प्रति गोदामात धूळखात पडल्यामुळे राज्य सरकारचे कोट्यवधी रुपये वाया गेले असून लाखो विद्यार्थी वंचित राहिले. 

खुल्या बाजारातून खासगी प्रकाशकांना कोट्यवधींचा नफा झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही शिक्षक संघटनांनी शिक्षण आयुक्तांना ही पुस्तके बाजारात आणण्यासाठी विनंती केली आहे.

या विषयावर ‘सीविक मिरर’कडे भूमिका मांडताना शिक्षक प्रतिनिधी सिद्धार्थ भोसले म्हणाले, ‘‘आठवी ते बारावीच्या स्वाध्याय पुस्तिका या पाठ्यपुस्तकावर आधारित असून लेखनाचा सराव तसेच बोर्ड परीक्षांचा सराव या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्य आहे. तसेच सातवी ते बारावीपर्यंतचे प्रात्यक्षिक नोंदवहीमध्ये प्रयोग दिलेले असून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या संबंधीची निरीक्षणे प्रात्यक्षिक नोंदवहीमध्ये नोंदणी करून शिक्षकांकडून तपासून घेणे अपेक्षित आहे. सदर स्वाध्याय पुस्तिका व कार्यपुस्तिका विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.’’

‘‘गेल्या तीन वर्षांपासून कोट्यवधी किमतीच्या स्वाध्याय पुस्तिका राज्यातील विविध गोदामांत धूळखात पडून आहेत. यामुळे लाखो पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे. कारण खासगी प्रकाशकांच्या गाईडच्या किमती ३०० ते ४०० रुपये किमतीच्या आहेत. त्या तुलनेत स्वाध्याय पुस्तिका ५० ते ६० रुपयात मिळू शकेल,’’ असा आरोप भाजपा शिक्षक सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश रासगे यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केला.

भाजपा शिक्षक सेलचे अध्यक्ष सुनील मोरे म्हणाले, ‘‘तब्बल २५ कोटी रुपये खर्चून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वाध्याय पुस्तिका (गाईड) छापून तयार आहेत. परंतु या पुस्तिका खुल्या बाजारात का विकायला आणत नाही? खासगी प्रकाशक अवाजवी किमतीत गाईड विकून नफा कमवत आहेत. त्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी काही अधिकारी यावर निर्णय घेत नाहीत, असा आमचा संशय आहे. लाखो पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे. या पुस्तिका बाजारात आणाव्या यासाठी आम्ही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.’’

यासंदर्भात ‘सीविक मिरर’ने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आणि बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest