कौशिकी चक्रवर्ती यांच्या स्वरांचे अद्भुत गारूड पूरिया कल्याणचे सूर ठरले अविस्मरणीय

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगतेची सायंकाळ लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली.

SawaiGandharvaBhimsenSangeetFestival's

कौशिकी चक्रवर्ती यांच्या स्वरांचे अद्भुत गारूड पूरिया कल्याणचे सूर ठरले अविस्मरणीय

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२३ : 'सवाई'च्या विस्तीर्ण मंडपात कणभरही जागा राहू नये, अशी रसिकांची विक्रमी गर्दी रविवारी झाली होती. कौशिकी यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले. सायंकाळी सहाच्या सुमारास कौशिकी यांचे स्वरमंचावर आगमन होताच, रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या आगमनाने रसिकांमध्ये उसळलेली चैतन्य आणि उत्साहाची लहर अवर्णनीय होती. रसिकांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून, तरूणाई, प्रौढ आणि बुजुर्गांपर्यंत सर्व प्रकारच्या श्रोत्यांचा समावेश होता.

कौशिकी यांनी समयोचित अशा 'पूरिया कल्याण ' रागात 'होवन लगी सांज' हा पारंपरिक ख्याल झुमरा तालात सादर केला. पाठोपाठ तीन तालात 'सुनलीनो मोरी शाम' ही द्रुत बंदिश सादर केली.‌तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा अतिशय मधुर आवाज, प्रसन्न मुद्रेने स्वतः आनंद घेत केलेले सादरीकरण, साथीदारांना वेळोवेळी दिलेली दाद आणि हे सारे सांभाळून रागभाव आणि बंदिशीमधून व्यक्त होणारा मूड नेमकेपणाने कायम ठेवण्याचे कौशल्य... यामुळे त्यांच्या गायनाने अल्पवयीन रसिकांच्या मनाची पकड घेतली. द्रुत लयीतील गायनात सरगमचे विविध पॅटर्न, वैविध्यपूर्ण लयकारी यामुळे त्यांनी वेगळा आनंद दिला.

आदीदेव महादेव, ही यमन रागातील शिवस्वरूपाचे वर्णन करणारी रचना, पहाडी ठुमरी सादर करताना कौशिकी यांचे भावदर्शन उल्लेखनीय होते. 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे' या रचनेत कौशिकी यांनी अत्यंत नजाकतदार स्वराकृतींनी मांडणी केली. लगेच अतिशय वेगळ्या भावावस्थेचे वर्णन करणारी 'हरी ओम् तत्सद्'  ही रचना सादर करून कौशिकी यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना ओजस अढिया (तबला), तन्मय देवचके (हार्मोनियम), उस्ताद मुराद खान (सारंगी) यांनी रंगतीत भर घालणारी साथ केली. अनुजा क्षीरसागर आणि आलापिनी निसळ यांनी तानपुरा साथ केली.

६९ व्य सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरेल सांगता पं. रोणू यांनी 

बासरीच्या हळुवार सुरावटींवर लहरणाऱ्या राग जयजयवंतीच्या साक्षीने रविवारी हजारो रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आणि ही किमया करणाऱ्या पं. रोणू मजुमदार यांच्या मधुर बासरीवादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची अतिसुरेल सांगता झाली.  पं. रोणू मजुमदार यांनी समयाला अनुसरून जयजयवंती रागाचे रूप बासरीवादनातून उलगडत नेले. अतिशय शांतपणे आलापी करत त्यांनी रागविस्तार फुलवत नेला. पं. रामदास पळसुले यांचा ढंगदार तबला साथीला येताच रोणू यांची सुंदर लयकारी सुरू झाली. या वादनाचा आस्वाद आमदार रवींद्र धंगेकर तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही घेतला. आपल्या वादनादरम्यान पं. रोणू यांनी वारंवार रसिकांशी संवाद साधल्याने त्यांचे वादन ह्दयाला भिडणारे झाले.

रसिकांच्या विनंतीला मान देऊन रोणू यांनी पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बाजे रे मुरलिया' या रचनेतील सौंदर्यस्थळे दाखवली. नंतर खेमटा तालात कजरी पेश करून पं. रोणू मजुमदार यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगता केली .त्यांना पं रामदास पळसुले यांनी तबला, कल्पेश साचला हे बासरी तर विनायक कोळी यांनी तानपुरा साथ केली. 

  प्रकृती अस्वास्थ्यामुळे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन होऊ शकले नाही. त्यामुळे २००४ मधील पं. भीमसेन जोशी यांच्या लाईव्ह मैफलीचे दुर्मिळ ध्वनिमुद्रण सांगता प्रसंगी ऐकवण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार सवाई गंधर्व यांच्या ध्वनिमुद्रिकेने या पाच दिवसांच्या स्वरसोहळ्याची सांगता झाली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest