Junnar : शिवजन्मभूमीत उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 25 Sep 2023
  • 02:58 pm
Junnar : शिवजन्मभूमीत उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

शिवजन्मभूमीत उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

२९ सप्टेंबरला होणाऱ्या घोषणेकडे राजकीय क्षेत्रासह सामान्य नागरिकांच्या नजरा

महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सोनवणे बोलत होते. राज्यासह देशालाही गर्व वाटेल अशा आणखीन तीन घोषणा २९ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गुजरातमध्ये नर्मदातीरी उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील भव्यदिव्य असणार, जुन्नर तालुक्यामध्ये हा पुतळा उभारण्यासाठी पंचवीस एकर जागेची निवड करण्यात आली असून त्याची खरेदी देखील झाली आहे. हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार असून त्यासाठी जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगाला शिवरायांच्या या पुतळ्याची नोंद घ्यावी लागेल, असा हा पुतळा असेल असं यावेळी शरद सोनवणे म्हणाले.

सुरुवातीला ही संकल्पना आपली स्वतःची असल्याने इतर कोणावरही आर्थिकभार न टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे "श्रीमंत योगी स्मारक ट्रस्ट" ( रजि - पुणे/0000/317/2023) ची स्थापना करण्यात आली आहे. पुतळ्यासह सदरील जागेमध्ये शिवकालीन इतिहास जागवणारे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असून संपूर्ण उभारणी आणि पुढे देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली असणार असल्याची माहिती यावेळी सोनवणे यांनी दिली.

२९ तारखेला होणार आणखीन तीन मोठ्या घोषणा !

गेली महिनाभरापासून माजी शरद सोनवणे यांच्या समर्थकांच्या माध्यमातून जुन्नर परिसरामध्ये मोठे फ्लेक्स तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून '२९ सप्टेंबर रोजी सर्वात मोठी घोषणा होणार' असे व्हायरल केले जात आहे. आता त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु २९ तारखेला आणखीन तीन मोठ्या घोषणा होणार असल्याचे देखील सांगण्यात आल्याने सर्वांच्या नजरा या ३ घोषणा कोणत्या? याकडे लागले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest