लोणी काळभोर: भावविश्व झाले पांडुरंगमय!

या अभंगात संत सोयराबाईंनी म्हटल्याप्रमाणे ध्येयी, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी एक झाली, म्हणजे दृश्य निर्माण करणारा, दृश्य आणि पाहणारा हे तिघे एक झाले असून अवघे विश्व पांडुरंगमय झाले आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती मंगळवारी (दि. २) लोणी काळभोर पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी जगद्गुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनाच्या निमित्ताने घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 3 Jul 2024
  • 03:08 pm
Wari 2024, Wari, Loni Kalhor, Pune, Pune News, Ashadhi Wari

संग्रहित छायाचित्र

जगद्गुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनावेळी लोणी काळभोर पंचक्रोशीतील भाविक भक्तीत लीन

तुळशीराम घुसाळकर: 

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग  || १ ||
मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया   || २ ||
नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम   || ३ ||
देही असूनी विदेही, सदा समाधिस्थ पाही   || ४ ||
पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी  || ५ ||

या अभंगात संत सोयराबाईंनी म्हटल्याप्रमाणे ध्येयी, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी एक झाली, म्हणजे दृश्य निर्माण करणारा, दृश्य आणि पाहणारा हे तिघे एक झाले असून अवघे विश्व पांडुरंगमय झाले आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती मंगळवारी (दि. २) लोणी काळभोर पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी जगद्गुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनाच्या निमित्ताने घेतली.

 संत भजनांच्या ओळी गात खांद्यावर भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत, सोबतीला आसमंतात घुमणारा टाळ-मृदंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामांत दंग झालेले वारकरी भक्तिभावाने ओथंबलेल्या अभंगाच्या ओळी गात, विठ्ठल भेटीच्या ओढीने आतुरलेले लाखो टाळकरी, फडकरी, वारकरी यांची मांदियाळी पुण्यातील नागरिकांचा दोन दिवसांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर प्रथमच मुक्कामी आला.

टाळ मृदंगाच्या निनादांत व टाळ-मृदंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर मंत्रमुग्ध झालेल्या वारकऱ्यांसह जगद्गुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा ३३९ वा पालखी सोहळा ग्रामीण भागातील व शिरूर- हवेली मतदारसंघातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर प्रथमच मुक्कामी आला. त्यावेळी पंचक्रोशीत जणू भक्तीचा मेळा लागल्याचा प्रत्यय आला. संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा साठवला. सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांसमवेत विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी अपूर्व उत्साहात फुलांची उधळण करत केले. यावेळी लोणी काळभोर परिसराला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झाले होते.

पुणे येथील निवडुंग्या विठोबा मंदिरात पहाटे विधीवत पूजा झालेनंतर सकाळी पालखी रथात ठेवण्यात आली. पालखी सोहळा पूलगेटमार्गे हडपसर येथे आला. गाडीतळ येथे विसावा घेऊन सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोरकडे मार्गक्रमण केले. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामात मिळालेली विश्रांती, यामुळे ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी झपझप पावले टाकत होते. डोळे पंढरीकडे, मुखी विठूरायाचे अखंड नाम उच्चारत व नामघोष करत अथकपणे व सातत्याने सर्व वारकरी एकवटून पायी विठोबाच्या दर्शनाच्या आशेने व ओढीने रिमझिम पडत असलेल्या पावसासमवेत भक्तिरसांत चिंब होऊन महामार्गावरील एक-एक टप्पा मागे टाकत हा पालखी सोहळा रथापुढे २७ व मागे ३८५ अशा एकूण ३३० दिंड्यांतील सुमारे ४ लाख ५० हजार वारक-यांसमवेत कवडीपाट येथे सोहळ्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केला.

पालखी संभाजीनगर येथे पुणे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्र व आमदार राहुल कुल मित्रमंडळाचे वतीने महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर आणि कार्यकर्त्यांनी पाच हजार बिस्कीट पाकिटांचे वाटप केले. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे सर्व ट्रान्सपोर्ट्स, ड्रायव्हर व क्लीनर्स तसेच एंजल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले. लोणी स्टेशन येथे माजी सरपंच नंदू काळभोर व त्यांच्या सहका-यांनी स्वागत केले. या ठिकाणी विश्वराज हॉस्पिटल व वैष्णवी नर्सिंग होमनजीक हवेली डॉक्टर असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पालखी सोहळा पालखी तळावर मुक्कामी पोहोचल्यानंतर आरती झाली. यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार तृप्ती कोलते, पंचायत समिती हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, साहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, कृषी अधिकारी सुमित शिंदे, मंडल अधिकारी नुरजहॉ सय्यद (लोणी काळभोर), गुलफाम शेख (थेऊर), गिताश्री काळे (अष्टापूर), अशोक शिंदे (वाघोली), कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिरखान पठाण, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, उपसरपंच प्रियांका काळभोर, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी, पंचायत समिती हवेलीचे माजी सभापती अनिल टिळेकर, माजी उपसभापती युगंधर काळभोर, सदस्य गौरी गायकवाड यांचेसमवेत दोन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. रात्री जागर व कीर्तन झाले.

मंगळवारी योगिनी एकादशीचा उपवास असल्याने सर्व वारक-यांना गावातील अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान ( ट्रस्ट ), संत निरंकारी मंडळ, शीतलाशक्ती मंडळ,तिरंगा मित्र मंडळ, शिवशक्ती मंडळ,जय बजरंग तरुण मंडळ, संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट, जय महाराष्ट्र तरुण संघटना, जय जवान ग्रामविकास प्रतिष्ठाण, राजा शिवछत्रपती तरुण मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, समता समाजसेवा तरुण मंडळ, क्रातिविर मित्र मंडळ, श्रीमंत अंबरनाथ मंडळ, महात्मा गांधी मित्र मंडळ तसेच मुस्लीम आणी सरदारजी समाज बांधव व इतर सेवाभावी संस्थांनी चहा व खिचडी, चिवडा आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले. रात्रभर चाललेल्या भजन, कीर्तन, जागर, प्रवचन व हरिनामाच्या जागरामुळे संपूर्ण लोणी काळभोर पंचक्रोशीतील परिसर विठ्ठलमय होऊन गेला होता. येथील पालखी तळाचे काम पूर्ण झाले आहे. असे असले तरी पालखी सोहळ्यातील बहुतांश दिंड्या गावातील शाळा, कॉलेज व आपल्या नेहमीच्या ठिकाणी मुक्कामी होत्या.

देव पहावया गेलो,  तेथे देवची होऊन गेलो...

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्ग सोडून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील नवीन पालखी तळाकडे मार्गक्रमण केले. त्यावेळी सर्व वारकरी टाळमृदंगाच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचत होते. यावेळी वरुणराजाने विश्रांती घेतली होती. टाळ-मृदंगाच्या झंकाराने संपूर्ण आसमंत निनादून गेला होता. काही जण फुगड्या खेळत होते तर काहींनी मानवी मनोरे उभारून भागवत धर्माची पताका आसमंतात फिरवून आपला आनंद व्यक्त केला. त्याच अपूर्व उत्साहात कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर ग्रामस्थांनी त्याचे फुलाच्या वर्षावांत स्वागत केले. यावेळी दुतर्फा नागरिक दर्शनासाठी उभे होते. ते रथाच्या पुढे डौलाने चालणा-या मानाच्या अश्वाचे दर्शन भक्तिभावाने घेत रथात ठेवलेली तुकाराम महाराज पालखी व पादुका दिसल्या तरी कृतकृत्य होत होते.

पर्यावरणरक्षणाच्या फलकांनी वेधले लक्ष

 पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे ढोल लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन मुलगी वाचवा आणी वृक्षदिंडीद्वारे झाडे लावा, झाडे जगवा आणी पर्यावरण वाचवा असा संदेश देऊन जनजागृती केली तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कलामंचच्या कलाकारांनी ग्रामस्वच्छता अभियान, महिला सबलीकरण व पर्यावरणांबाबत जनजागृती केली. यावेळी वनखात्याच्या वतीने प्रथमच एक झाड आईसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत एक हजार वड, पिंपळ, चिंच आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल मंगेश सपकाळे, वनरक्षक अंकुश कचरे (लोणी), मधुकर गोडगे (हडपसर), अशोक गायकवाड (खामगांव टेक), संजीव कांबळे (वडकी) व पांडुरंग भिकने (अष्टापूर) उपस्थित होते.

आरतीच्या वेळी गोंधळ

आरतीच्या वेळी दोन्ही ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी पाच सदस्यांनी आरतीसाठी यावे, असे तहसीलदार यांनी सांगितले असताना अनेक जणांनी घुसखोरी केल्यामुळे स्टेजवर थोडी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले.   यातून तहसीलदार कशाबशा बाहेर पडल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी कवडीपाट टोलनाक्यावर येताच  पुण्याकडून जड वाहनांसाठी वाहतूक खुली केल्यामुळे टोल नाक्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. यामुळे वारकरी व भक्तांना अडचणींना सामोरे जावे लागले. सदर बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी जड वाहने तेथेच थांबवली त्यानंतर पालखी पुढे सरकली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest