Pune : भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जींची अमेरिकन व्यावसायिकाकडून फसवणूक

संशोधन विषयक माहिती या व्यवसायिकाने कंपनीसाठी अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या बहाण्याने मुखर्जी यांच्या कडून काढून घेतली. अन् आता मुखर्जी यांच्या या संशोधनाला हा अमेरिकन व्यवसायिक स्वतःचे संशोधन असल्याचे सांगत अमेरिकेत व्यवसाय करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 6 Oct 2023
  • 05:48 pm
Pune : भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जींची अमेरिकन व्यावसायिकाकडून फसवणूक

भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जींची अमेरिकन व्यावसायिकाकडून फसवणूक

मुखर्जी यांचे संशोधन चोरून व्यावसायिक अमेरिकन विद्यापीठाशी करार करण्याच्या तयारीत

पुणे : तब्बल १२ पेटंट नावावर असणारे अन् पर्यावरण, ऊर्जा, औषध आदी विविध क्षेत्रात संशोधन करणारे अंतराष्ट्रीय पातळीवरील भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांची एका अमेरिकन व्यावसायिकांकडून फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील काही वर्षांपासून वातावरणातील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील संशोधन मुखर्जी करीत आहेत. ही संशोधन विषयक माहिती या व्यवसायिकाने कंपनीसाठी अर्थसहाय्य   मिळवून देण्याच्या बहाण्याने मुखर्जी यांच्या कडून काढून घेतली. अन् आता मुखर्जी यांच्या या संशोधनाला हा अमेरिकन व्यवसायिक स्वतःचे संशोधन असल्याचे सांगत अमेरिकेत व्यवसाय करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी केला आहे. तसेच हे केवळ माझे संशोधन नाही, तर जागतिक समस्येवर भारताने शोधलेले उत्तर आहे. मात्र, या अमेरिकन व्यवसायिकाने हे संशोधन कोणतेही क्रेडिट मला किंवा भारताला न देता, आपल्या नावाने सांगण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही केवळ माझी नाही तर भारता सोबत केलेली फसवणूक आहे. या संदर्भात आपण पंतप्रधान कार्यालयाला कळवले असल्याचे ही मुखर्जी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

नेमकं प्रकरण काय आहे?

वातावरणातील कार्बन डायऑक्साईड चे वाढते प्रमाण ही एक जागतीक समस्या आहे. या जागतिक समस्येवर उपाय म्हणून मागील काही वर्षांत मुखर्जी यांनी बायो टोक्नॉलॉजीवर आधारीत Synthetic genetically modify hemoglobin base carbon capture हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. म्हणजे, आपल्या शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्याचे काम हिमोग्लोबईन हा घटक करत असतो. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिमरीत्या हिमोग्लोबईन कसा  तयार करता येईल, या विषयक संशोधन मुखर्जी यांनी विकसीत केले आहे. काही वर्षांपूर्वी मुखर्जी हे US CONGRESS COMITEE FOR CARBON UTILISATION & RESOURCE (CURC) कॉन्फरन्ससाठी अमेरिकेत गेले होते. तेथे मुखर्जी यांनी आपले संशोधन मांडले. तसेच याच संशोधनातून मुखर्जी यांनी शेत जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त असा एक घटक निर्माण केलेला आहे. यामुळे या संशोधनाचा जगाला दुहेरी उपयोग होणार आहे.

हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी बेंगलोर येथील काही बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांशी चर्चा सुरू असताना मुखर्जी यांची या अमेरिकन व्यावसायिकांशी ओळख झाली. यावेळी मुखर्जी आपल्या  संशोधनाचे पेटंट मिळविण्याच्या तयारीत होते. पण या  व्यावसायिकाने मुखर्जी यांना आपण या संशोधनावर आधारीत एका मोठा भागीदारी व्यावसाय सुरू करू असे  आश्वासन देत मुखर्जी यांना संशोधनाचे पेटंट मिळविण्या पासून थांबवून ठेवले. अशातच काही वर्ष गेली. शेवटी या अमेरिकन व्यावसायीकाकडून कोणत्याच आश्वासक हलचाली होत नाहीत, हे पाहून मुखर्जी यांनी त्याच्या सोबत व्यावसाय करण्याचा विचार थांबला. मात्र, या दरम्यानच्या काळात सदर अमेरिकन व्यसायिकाने मुखर्जी यांच्या संशोधना संबंधी जवळपास सगळी माहिती व रिसर्च पेपेर काढून घेतले होते. त्यामुळे मुखर्जी यांच्या सोबतचा संपर्क तुटल्या नंतर आता हा व्यसायिक एका अमेरिकन विद्यापीठाशी करार करून मुखर्जी यांच्या संशोधनावर आधारीत प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुखर्जी यांचे आक्षेप / मागणी काय आहे ?

>>वातावरणातील कार्बन डायऑक्साईड चे वाढते प्रमाण या जागतिक समस्येवर उपाय भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले असून याचे सर्व पुरावे मुखर्जी यांच्याकडे आहे.

>>मुखर्जी यांच्या कडून  या अमेरिकन व्यवसायिकाने मुखर्जी यांच्या संशोधन विषयक सर्व माहिती घेऊन फसवणूक केल्याचे पुरावे आहेत.

>>भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान या अमेरीकन व्यवसाईकांच्या माध्यमातून जागा समोर आल्यास हे मुखर्जी यांचे व पर्यायाने भारताचे अपयश असेल, त्यामुळे भारत सरकारने यामध्ये लक्ष घालावे.

>>योग्यता असूनही योग्य संधी न मिळाल्याने किंवा सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे भारतातील संशोधक, शास्त्रज्ञ देशाबाहेर गेल्याचे अनेकदा दिसून आले आहे, असे  प्रकार टाळण्यासाठी आणि माझी जशी फसवणूक झाली ते रोखण्यासाठी सरकारने संशोधन क्षेत्राला वाव मिळेल असे धोरण तयार करणे आवश्यक आहे.

>>सदरील संशोधनात अमेरिकन व्यवसायिकाणे फसवणूक केल्याने हे संशोधन फक्त अमेरिकेच्या नावावर जाण्याचा धोका नसून या निमित्ताने होणारी रोजगार निर्मितीही आपण गमावून बसलो आहोत. सरकारने सहकार्य केल्यास या गोष्टी टाळता येणे शक्य होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest