Pune : शहरात साडेसात हजार ‘बंदूकबाज’

पुणे शहरामध्ये (Pune News) गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत असून या निमित्ताने बंदूक बाळगणाऱ्या अधिकृत परवानाधारकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.

Pune News

शहरात साडेसात हजार ‘बंदूकबाज’

अधिकृत परवानाधारकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण सुरू, बेकायदा शस्त्र तस्करीविरुद्ध अधिक आक्रमक कारवाई

पुणे शहरामध्ये (Pune News) गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत असून या निमित्ताने बंदूक बाळगणाऱ्या अधिकृत परवानाधारकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. यातून पुण्यात  सुमारे साडेसात हजार नागरिकांकडे परवानाधारी बंदूक असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime) 

 मागील वर्षी गोळीबाराच्या १४ घटना शहरात घडल्या होत्या. चालू वर्षात ५ जानेवारी रोजी कुख्यात शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. तर, हिंजवडीमधील एका आयटी इंजिनियर तरुणीचा तिच्या प्रियकराने हॉटेलमध्ये गोळी झाडून खून केला होता. नुकतेच एका सराफा व्यावसायिकाने मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करीत जागामालकाचा खून करीत स्वत:लादेखील संपवले. एकामागे एक घडत चाललेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील अधिकृत शस्त्र परवानाधारक आणि अनधिकृत शस्त्र बाळगणारे यांच्या कुंडली मांडण्यास सुरुवात केली आहे.(Pune Police)

शहरात साडेसात हजार अधिकृत 'बंदूकबाज' असून त्यांच्या माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासोबत गुन्हे शाखेकडून अनधिकृत शस्त्र तस्करीबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले आहे. याबाबत मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना सांगितले की, ‘‘पुणे पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून जवळपास साडेसात हजार शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही शस्त्रे कोणाच्या नावे आहेत? त्यांचा 'मेक' कोणता आहे? कोणत्या कारणांसाठी शस्त्र परवाने देण्यात आले आहेत, याची सर्व माहिती गोळा करून त्याचे एकत्रीकरण करण्यात येत आहे.’’

ही माहिती येत्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानेदेखील महत्त्वाची ठरणार आहे. आचारसंहितेच्या काळात ही शस्त्र पोलिसांकडे जमा करून घेतली जातात, असेदेखील उपायुक्त रोहिदास पवार यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना शस्त्र परवाना दिला जात नाही. शस्त्र परवाना देताना संबंधिताची चारित्र्य पडताळणी केली जाते. त्याचा अहवाल घेतला जातो. त्यानंतरच परवाना दिला जातो. मागील काही वर्षात दिल्या गेलेल्या परवान्यांची छाननी केली जात असून कोणत्या वर्षात किती परवाने दिले गेले, त्याचीही वर्षनिहाय नोंद अपडेट केली जात आहे.

बेकायदा शस्त्र तस्करी रडारवर

जमिनींचे व्यवहार, रियल इस्टेटमधील जीवघेणी स्पर्धा, गुन्हेगारीमधून जिवाची असलेली भीती, भाई होण्याची खुमखुमी, दहशत आदींमुळे शस्त्रांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील बेकायदा शस्त्रतस्करीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून शस्त्र तस्करांवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘‘मागील वर्षभरात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये १४७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून ९८ पिस्तूल तसेच  २३८ काडतुसे जप्त करण्यात आली. पुण्यात आजवर झालेल्या कारवाईमधून असे निदर्शनास आले आहे की, या शस्त्रांची तस्करी मुख्यत्वे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहारमधून होत आहे.’’

स्थानिक किंवा परजिल्ह्यातील विक्रेत्यांमार्फत ही शस्त्र तस्करी होत असते. रेकॉर्डवरील तस्कर, गुन्हेगार यांची झाडाझडती घेतली जात आहे. पोलीस आयुक्तांनी मागील पाच वर्षात शस्त्रासंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याचीदेखील प्रक्रिया सुरू असल्याचे उपायुक्त झेंडे यांनी आवर्जून सांगितले.

 

कारवाईची आकडेवारी

वर्ष दाखलगुन्हे जप्त शस्त्र अटक आरोपी

२०२१ ८४ ७५        ८८

२०२२ ५४ ८२ ९३

२०२३ ९१ ९८ १४७

एकूण २२९ २५५ २२८

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest