पुण्यातील मुठा नदीपात्रात जलपर्णीचा खच, नदीचा श्वास कोंडला
पुणे शहरातून वाहणारी मुठा नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मुठा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे वाहत आलेली जलपर्णी वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाजवळील पुलास अडकली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंगीच्या आजाराची लागण होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. संपूर्ण नदीपात्रात जलपर्णीचा खच साचला आहे. अशातच ऐन पावसाळ्यात आता महापालिकेकडून जलपर्णी काढायला सुरूवात झाली आहे.
पुणे शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा मुठा नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. नदीतून वाहत आलेली जलपर्णी शहरातील अनेक नदीकाठावर साचल्याचे चित्र दिसून येत आहे. कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव, राजीव गांधी प्राणी संग्रहालय तलाव, सारसबाग येथील पेशवे पार्क तलाव, पाषाण तलाव, जांभुळवाडी तलाव आणि संगमवाडी ते मुंढवा जॅकवेलपर्यंत नदीपत्रात साचली जलपर्णी आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पुणे शहर आणि जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या पाण्यामुळे वाहत आलेली जलपर्णी मुठा नदीतील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाजवळील पुलास अडकली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा खच निर्माण झाला होता. मात्र, आता ऐन पावसाळ्यात महापालिकेकडून जलपर्णी काढायला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने मुठामधील जलपर्णी काढण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.