सुप्रिया सुळे
पूर्ण अभ्यास करायचा नाही आणि कोणीतरी काढलेल्या नोट्स वाचून दाखवायच्या, यामुळे त्यांना अर्धवट माहिती मिळते. पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय पास होत नाही. शंभर मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लिहिलेले त्यांना दिसले नसावेत. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज त्यांना आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा काल पुण्यात होते. या बैठकीच्या वेळी भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला होता. यावेळी शरद पवारांबद्दल लिहिलेले लोक माझे सांगाती या पुस्तकांमधील दहा मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी वाचले व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात असल्याचे सांगितले होते.
यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य टोला नसून शरद पवारांचे कौतुक आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्याकडून शिकवण घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस असे म्हणाले असा मी याचा अर्थ काढला आहे.”
राष्ट्रवादीचे आमदार अशोक टेकवडे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी अशोक टेकवडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले आहे. पक्षाने त्यांना आमदार देखील बनवले होते. जिथे ते जातील तिथे त्यांना खूप शुभेच्छा तिथे त्यांनी नांदावं आणि सुखी राहावं,” अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.