जनतेनी केलेली भाऊबीज हा अनमोल ठेवा - अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे
सर्वत्र दिवाळीचा आनंदोत्सव आणि धामधूम सुरू असताना सुद्धा अग्निशमन दलाचे जवान हे स्वतःच्या घरच्या दिवाळीला उपस्थित राहू शकत नाहीत. भाउबीजेला स्वतःच्या बहिणीकडे सुद्धा जाऊ शकत नाहीत. त्यांच्या या कर्तव्य तत्पर सेवेचा विचार करून भोई प्रतिष्ठानने आमच्यासाठी केलेली भाऊबीज हा प्रत्येक अग्निशमन दलाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. त्यांच्या या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो असून पुढील वर्षभर आम्हाला सर्व संकटाला जिद्दीने आणि धैर्याने तोंड देण्याची प्रेरणा या प्रेमवर्षावाने मिळत राहील असे प्रतिपादन पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे वतीने सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा अग्निशमन दलाचे जवानांना ओवाळून भाऊबीज साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यंदा या उपक्रमाचे सलग 28 वे वर्षे होते.
याप्रसंगी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ रुपाली चाकणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग डॉ. जालिंदर सुपेकर, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. राजेंद्र हिरेमठ, पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, आमदार रवींद्र धंगेकर, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, अभिनेत्री जयमाला इनामदार, कर्नल सुरेश पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल, गणेश घुले, ज्येष्ठ विचारवंत उल्हास दादा पवार, संदीप खर्डेकर, जया किराड श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे महेश सूर्यवंशी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी तसेच विविध गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था व सामाजिक राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोई प्रतिष्ठान गेले सत्तावीस वर्षे सलग पणे करत असलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक करून अग्निशमन दलासारख्या संस्थेच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आमदार रवींद्र धंगेकर यांनी या दलासाठी सर्व सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना अग्निशमन दलाच्या कर्तव्य तत्पर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेली 28 वर्षे हा उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असल्याचे सांगीतले.
यानिमित्ताने स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचे जवान यांच्या जाहीर सन्मान करण्यात आला. या निमित्ताने सेल्फी विथ फायर ब्रिगेड या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुणेकरांनी अग्निशमन दलाच्या कर्तव्य तत्पर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अग्निशमन दलांच्या जवानांसोबत सेल्फी घेऊन स्वतःच्या स्टेटसला ठेवून त्यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी संयोजकांनी दिली.
मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे श्री मुस्ताक पटेल, हरून बागवान, अॅड मारूफ पटेल, हाजी ईकबाल तांबोळी, इकबाल दरबार, सय्यद अली यांच्या वतीने अग्निशमन दलाच्या जवानांसाठी बनवलेला खास शिरखुर्मा चा आस्वाद जवानांनी घेतला. माजी आमदार मोहन जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. आशिष जराड यांनी सुत्रसंचालन केले.