Pune Accident : दारूच्या नशेत कारचालकाने अनेक वाहनांना उडवले, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

एका पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. नारायण पेठ पोलीस चौकीजवळील झेड ब्रिज जवळ हा अपघात घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 7 Oct 2023
  • 11:28 am
Pune Accident : दारूच्या नशेत कारचालकाने अनेक वाहनांना उडवले, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

दारूच्या नशेत कारचालकाने अनेक वाहनांना उडवले, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

पुण्यात संतोष माने घटनेची आठवण करून देणारी घटना घडली आहे. एका कारचालकाने दारूच्या नशेत अनेक वाहनांना उडवले. या घटनेत एका पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. नारायण पेठ पोलीस चौकीजवळील झेड ब्रिज जवळ हा अपघात घडला.

उमेश हनुमंत वाघमारे (वय ४८) असे या कार चालकाचे नाव आहे. तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय ४४) असे गाडीमालकाचे नाव आहे. या अपघातात विश्वनाथ राजउपाध्ये (वय ५६) यांचा जागीच मृत्यू झाला. नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने जात होते. बाबा भिडे पुलाजवळील चौकाच्या पुढे गेल्यानंतर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. भरधाव मोटारीने हिंदू महिला आश्रमाच्या जुन्या इमारतीच्या कोपऱ्यावर पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवले.

गाडगीळ पुलाजवळ झालेल्या या अपघातात ५५ वर्षीय  एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला. मोटारीने धडक दिलेल्या वाहनांमध्ये दुचाकी आणि काही रिक्षा होत्या. त्यामुळे यातील काही प्रवासी जखमी झाले. केळकर रस्ता, लक्ष्मी रास्ता , टिळक चौक या भागात रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. त्यानंतर दारूच्या अंमलाखाली असलेल्या कारचालकाला लोकांनी आधी चोप दिला आणि नंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest