शालेय पोषण आहारात अंडी नकोत : डॉ. कल्याण गंगवाल
पुणे : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करत शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी,(egg) अंडा भुर्जी, अंडा बिर्याणी, केळी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा शासन निर्णय ५ डिसेंबर २०२३ पासून लागू केला जाणार आहे. शास्त्रीयदृष्ट्या मांसाहार आरोग्यास हानिकारक असून, शालेय पोषण आहारात अंडी दिली जाऊ नयेत," अशी मागणी शाकाहार चळवळीचे पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल (Dr. Kalyan Gangwal) यांनी पत्रकार परिषदेत केली.
शाळांमधून जेवणात अंडी देणे अयोग्य आहे. शाळेतील जैन, महानुभव पंथी, ब्राह्मण व अन्य शाकाहारी विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होईल. इतर विद्यार्थी अंड्यांचे पदार्थ खाताना त्यांनाही ते पदार्थ खाण्याची इच्छा होईल. वय लहान असल्याने त्यांना या गोष्टींचे ज्ञान नसते. त्यातून ही सवय जडली जाईल. एक प्रकारे या जैन व शाकाहारी मुलांना मांसाहारी बनविण्याचे महाराष्ट्र शासनाने षडयंत्र असून, ही अतिशय गंभीर बाब असल्याचा आरोपही डॉ. कल्याण गंगवाल यांनी केला.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, "शासनाने निर्णयामध्ये असेही सांगितले आहे की, अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी ही योजना चालू केली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांना मांसाहारी बनविणे कितपत योग्य आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. आपला धर्म वाचविण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र सामाजिक लढा देणे गरजेचे आहे."
"अंडे मांसाहारी असून, अंड्यातून कुठलेही पोषक घटक मिळत नाहीत. अंड्यात 'सी' व्हिटॅमिन नाही. प्रोटिन्सही केवळ १३.५ टक्के इतकेच आहे. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात असते. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर अँटिबायोटिक्स, हार्मोन्सचा मोठा मारा होतो. शिवाय अंड्यांची उत्पत्ती अधिक व्हावी, याकरिता अनैसर्गिक प्रक्रिया केली जाते. अंडी शिळी की ताजी, याचीही आपल्याला माहिती नसते. त्यामुळे त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळते," असेही डॉ. गंगवाल यांनी सांगितले.
अंड्याच्या सेवनामुळे सालमोनेला (टायफॉईडचा ताप), ऍलर्जी, सर्दी, दमा, त्वचारोग, फूड पॉइजनिंग, पचन प्रक्रियेत बिघाड आदी आजार बळावतात. अनेक घातक अंश शरीरात येत असल्याने ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. अंडी शाकाहारी नाहीत. अफलित अंड्यातील जिवंत स्त्रीबीजाला आपण मारतो. अशा हिंसक आहारामुळे मानसिक आरोग्यही बिघडते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण का खेळतोय, याचा विचार शाळा व पालकांनी करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.