संग्रहित छायाचित्र
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं? मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं? सासरी जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये... मनाला भिडणाऱ्या या कवितेच्या ओळीतून एक बाप आपल्या मुलीसाठी कसा हळवा होतो, हे आपल्याला समजते. परंतु त्याच मुली जेव्हा सासरहून बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माहेरी येतात, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्याची भावना बापाच्या मनात कायमची घर करून बसते. हा क्षण भावपूर्ण क्षण अनुभवला वडगाव शेरीत निवडून आलेले आमदार बापूसाहेब पठारे यांनी.
पठारे यांच्या मुलींनी तसेच कुटुंबातील महिलांनी बापूसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला अन् त्यांच्या विजयासाठी लढल्या. ३६ दिवस तब्बल ५०० किलोमीटरहून अधिक अंतर पायी प्रवास करत मतदारसंघ पिंजून काढून त्यांनी घराघरात पक्षचिन्ह पोहोचवले. त्यामुळे अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये बापूसाहेब पठारे यांनी मिळवलेल्या विजयात कार्यकर्त्यांसोबतच त्यांचेही प्रयत्न उपयोगी ठरले.
या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या उमेदवारांत लढत होती. बापूसाहेब पठारे आणि सुनील टिंगरे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. पठारे हे १० वर्षांनी पुन्हा आमदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले. पुणे शहरात महाविकास आघाडीचे निवडून आलेले ते एकमेव उमेदवार आहेत. पठारे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचे अगदी सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. बापूसाहेब यांना जनतेत मिसळायला अवडते. समस्या सोडविणे त्यांच्या सुख दु:खात सहभागी होणे, हे त्यांच्या रक्तात आहे. गेल्या दहा वर्षात कोणतीही सत्ता नसताना ते जनतेसाठी काम करत राहिले. पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर मतदारसंघात विकासकामे वेगाने करता येतील, अशी त्यांची धारणा होती. हीच नस ओळखून त्यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांनी गेल्या चार वर्षांपासून रणनीती आखली होती. प्रत्यक्ष प्रचारात उतारताना कुंटुंबातील सदस्य असतील तर याचा प्रभाव नक्कीच मतदारांवर पडेल, असे नियोजन करुन पठारे कुटुंबातील रुपाली, दीपाली, सुनीता, रजनी, प्रणिता, तृप्ती या सर्व बहिणी तसेच भावकीसह खराडीगावातील सर्व महिला अशा सुमारे १०० ते १५० महिलांनी
३६ दिवस वडगाव शेरी मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे राष्ट्रवादीचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचविण्यात आम्हाला यश आले, असे या महिलांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
रुपाली म्हणाल्या, ‘‘आप्पा (बापूसाहेब पठारे) यांनी केलेली कामे आणि पक्ष चिन्ह जनतेसमोर गेले पाहिजे, यावर आम्ही भर दिला होता. वडगाव शेरी मतदारसंघातील ९० टक्के भागात आम्ही घरोघरी जाऊन प्रचार केला. या भागातील महिलांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न समजून घेतले. अनेक महिलांनी आप्पांनी केलेल्या कामांची आठवण सांगत गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यामुळे आप्पांनी जनतेशी कशी नाळ जोडली, हे आम्हाला दिसले. मतदारसंघात प्रचार करताना नागरिकांच्या भावनादेखील समजल्या. विकासकामे तसेच वैयक्तिक स्तरावर केलेली कामे ही जनतेच्या लक्षात राहतात, हे प्रकर्षाने जाणवले.’’
लोहगाव, हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ, खराडी, थिटेवस्ती, टिंगरेनगर, धानोरी, येरवड्याचा काही भाग, मांजरी याभागासह मतदार संघातील ९० टक्के भागात पायी प्रवास केला. सुमारे ८० हजाराहून अधिक घरांत जाऊन आप्पाचा प्रचार केला. प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधता आला, याचे मोठे समाधान आहे. प्रत्येक माणसाला प्रचारादरम्यान आप्पा भेटू शकतील, हे शक्य नव्हते. पण घरातील, कुंटुंबातील व्यक्तीची भेट झाली तरी मतदारांला ते आवडते, हे यावेळी दिसून आले, असेही रूपाली यांनी सांगितले.
मतदारसंघातील प्रत्येक भागात कार्यकर्ते होते. त्यांच्या माध्यमातून परिसरात फिरणे सोपे झाले. त्यांच्या ओळखीमुळे मतदारांशी संवाद साधणे सहज शक्य झाले. मी बापूसाहेब पठारे यांची मुलगी आहे, आता आप्पांना मत द्या, असे कधीच प्रचारादरम्यान मतदारांना बोललो नाही. त्यांच्यासमोर भाषण करण्यापेक्षा त्यांचे प्रश्न समजून घेण्यावर भर दिला. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न लिहून घेतले. समस्या, अडीअडचणी सोडविण्याचा शब्द दिला. म्हणून मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला. प्रचारादरम्यान लिहून घेतलेले प्रत्येक प्रश्न, समस्या याची यादी तयार केली आहे. ती यादी आप्पांना दिली असून त्या सोडविणार आहोत. तसेच त्या समस्या सुटल्यानंतर याचा हिशोब जनतेला दिला जाणार आहे. अशी माहितीही रुपाली दिली.
जनेतला गृहित धरु नका....
सार्वजनिक जीवनात वावरताना जनता आपल्यावर लक्ष ठेऊन असते. जनतेसोबत आपण कशाप्रकारे वागलो, याचा ते हिशोब ठेवत असतात. म्हणूनच अनेकांनी सांगितलेले अनुभव मनात घर करणारे होते. गेल्या १० वर्षात आप्पांनी केलेली कामे, मदत ही मतदारांच्या लक्षात होती. आम्ही या माणसाची गेल्या १० वर्षांपासून वाट पाहतो आहोत, असे सांगून आमचे मत पठारे यांनाच, असा शब्द मतदार देत होते. नेतला गृहित धरण्याचा विचारदेखील केला नाही. त्यामुळेच निवडणुकीत विजय मिळवता आला, असे पठारे यांच्या कुटुंबातील महिलांनी ‘सीविक मिरर’ला आवर्जून सांगितले.