संग्रहित छायाचित्र
राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी केंद्रात मोबाईल तसेत इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेवून जाण्यास बंदी होती. त्यानंतरही उमेदवारांच्या मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींनी बुटामध्ये मोबाईल लपवून नेल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार समजात पोलिसांनी तब्बल २१ जणांना मतमोजणी केंद्रातून बाहेरचा रस्ता दाखविला. हा प्रकार कोरेगाव पार्क भागातील शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात शनिवारी मतमोजणी करताना घडला.
मतमोजणीसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जातो. केंद्रात प्रवेशासासाठी त्यांना ओळखपत्रही देण्यात येते. केंद्रात आत जाताना पोलिसांकडून तपासणीदेखिल केली जाते. तरीसुध्दा तब्बल २१ जणांनी बुटामध्ये आणि मोज्यामध्ये मोबाइल लपवून आत नेल्याचा प्रकार उघडकीस आला. शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, कॅन्टोन्मेंट, कसबा या आठ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी झाली. या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. मतमोजणी केंद्रात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मोबाइल, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास मनाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते. मतमोजणी केंद्रात विनापरवानगी (पासशिवाय) प्रवेश नाकारला जात होता. मतमोजणी केंद्रात काडीपेटी, तसेच अन्य ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली होती. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही फक्त मीडिया सेंटरमध्येच मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट नेण्यास परवानगी होती. हे सर्व नियम लागू असले, तरी अनेकांनी चोरीछुपे मोबाइल नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात येत होती, तसेच हातानेही कर्मचारी आत प्रवेश करणाऱ्याची तपासणी करत होते. मात्र, तरीही राजकीय पक्षाचे २० कार्यकर्ते आणि एक पत्रकार शूजमधून मोबाइल मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाताना आढळून आला. केंद्राबाहेरचा रस्ता मोबाइल लपवून मतमोजनी केंद्रात नेत असल्याची बाब सहआयुक्तांच्या कानावर पडल्यावर त्यांनी तातडीने परिमंडळाच्या उपायुक्तांना तेथे धाडले. त्यांना सक्त सूचना देऊन मोबाइल नेणाऱ्यांना केंद्राबाहेरचा रस्ता दाखविण्यास सांगण्यात आले.