संग्रहित छायाचित्र
मुंबई-बेंगलोर बायपास महामार्गावरील वारजे उड्डाणपुलावर रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम समोर एलपीजी टॅंकर पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने पाच क्रेनच्या साह्याने हा ट्रॅकर संध्याकाळी ५ वाजता बाजूला केला.
मुंबई-बेंगलोर बायपास महामार्गावर वारजे उड्डाणपूल हा अपघात प्रवणभाग आहे. या ठिकाणी मोठे अपघात होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. भारत पेट्रोलियम पेट्रोलपंपाच्या समोरच इंडियन ऑइलचा एक एलपीजी टॅंकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. टॅंकर पटल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोट होवून मोठी दुर्घंटना घडली असती, परंतु टँकर भरलेला असल्याने बचाव पथक अधिक सतर्कपणे काम करीत होते. अपघातात टँकर रस्त्यात पूर्णपणे आडवा पडल्याने वाहतूक कोंडी झाली. टॅंकरचा मागील भाग रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता तर ड्रायव्हर केबिनसह पुढचा भाग पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅकवर घुसला आणि पलीकडच्या बाजूला धडकला. सुदैवाने समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. पलीकडच्या ट्रॅकवरही कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाली होती. साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून, सध्या वाहने सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली होती. यामुळे सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना घटनास्थळी तैनात केले असून, टँकर हटवण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रथमिक माहितीनुसार, टँकरच्या वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज आहे. वाहनचालकाच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी तातडीने पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांना वारजे पुलावरून जाण्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी अपघातामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी लवकर सुटणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू आहे.
अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल
मुंबईहून एलपीजीने भरलेला टँकर कात्रजकडे जात होता. वारजे येथील पुलावर आल्यावर या टँकरच्या पुढील बाजूचा टायर फुटला. त्यामुळे टँकरची पुढील बाजू पुलाला घासत जाऊन पलटला. त्यामुळे टँकरची मागील बाजूची कॅप्सुल संपूर्ण रोडवर आडवी झाली. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळतात दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ दोन क्रेन आणले. तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांना टँकरचा पुढील भाग व कॅप्सुल बाजूला करण्यात यश आले आहे. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरु करण्यात आली. त्यानंतर आणखी तीन क्रेन मागवण्यात आल्या याक्रेनच्या साह्याने संध्याकाळी पाच वाजता टँकरची कॅप्सुल रस्त्यातून बाजूला काढण्यात आली.
इंधनाने भरलेला टँकर उलटल्यानंतर अशी घेतात काळजी...
इंधनाने भरलेला टॅंकर उलटल्यानंतर अनेकवेळा मोठी दु्र्घटना घडण्याची शक्यता असते. अशा वेळी तात्काळ काळजी घेतली जाते. अनेकदा वायु ज्वलनशील पाण्यात विरघणारा असतो, त्यावेळी टॅंकरवर सातत्याने पाण्याचा फवारा मारला जातो. किंवा टॅंकर कोसळल्यानंतर त्याच्या आतील गॅसचे तापमान वाढू नये म्हणूनदेखील त्याच्यावर पाण्याचे फवारे मारून टॅंकर थंड ठेवला जातो. त्याचवेळी समांतरपणे एका टॅंकरमधून वायू काढून दुसऱ्या टॅंकरमध्ये भरण्याचे कामदेखील केले जात असते. अपघातामुळे रस्त्यावर सांडलेले तेल हे सर्वांत घातक असते. ते अग्निशामक दल तातडीने धुवून काढत असते. अचानक एखादी ठिणगा यामध्ये पडली तर मोठा स्फोट होऊन भयंकर दुर्घटना होण्याची त्यामुळे परिस्थिती निर्माण होत नाही.