दोसांजचा कार्यक्रम रेटून नेण्याचा प्रयत्न; कोथरूडकर उतरले रस्त्यावर; म्युझिक कॉन्सर्टला स्थानिकांचा विरोध

पुण्यातील कोथरूड परिसरातील काकडे फार्म येथे रविवारी सुप्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांजच्या म्युझिक कॉन्सर्टच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दुपारपासूनच मोठी गर्दी जमू लागली. मात्र स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला विरोध करत कार्यक्रम स्थळी निदर्शने केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 25 Nov 2024
  • 03:46 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील कोथरूड परिसरातील काकडे फार्म येथे रविवारी सुप्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांजच्या म्युझिक कॉन्सर्टच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दुपारपासूनच मोठी गर्दी जमू लागली. मात्र स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला विरोध करत कार्यक्रम स्थळी निदर्शने केली. याबरोबच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी केली. तरीही आठ वाजे पर्यंत कार्यक्रम रद्द झाल्याची कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. 

मात्र तरीही कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी जमल्यानंतर . कार्यक्रमाच्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्तेदेखील जमले. दोसांझ सध्या 'दिल लुमिनाटी' या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या टूरवर आहे. दोसांझ हा तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे अपेक्षितच होते.

या कार्यक्रमाबाबत कोथरूडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे भूमिका मांडली. या निवेदनात पाटील म्हणाले की, पुण्यात कोथरूडमधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच एक नागरिक म्हणून विरोध आहे. फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही, तर या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक जाम आणि कर्कश आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा, अशा सूचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये हा कार्यक्रम झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन. असे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. एका निवदेनाद्वारे कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी केली. मानकर म्हणाले, काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमास माझा जाहीर विरोध आहे. या कार्यक्रमामुळे खुले आम दारू विक्री, कर्कश आवाज तसेच वाहतूक कोंडी या सगळ्या समस्यांना कोथरूड मधील नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजकांनी त्वरित रद्द करावा. कोथरूडची संस्कृती खराब करणार्‍यांना आमचा कायम विरोध आहे. कार्यक्रम रद्द न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

रवींद्र धंगेकर यांनी देखील ट्विट करत याबद्दल भूमिका मांडली. धंगेकर म्हणाले, स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही कोथरूडमध्ये दिलजीत दोसांझ या गायकाच्या शोचे आयोजन केले आहे. रहिवासी क्षेत्रालगत पार्किंग व्यवस्था नसताना ४० हजार नागरिकांच्या या शो ला परवानगी दिल्याने कोथरूडकरांचे जे हाल होतील त्याला सर्वस्वी परवानगी देणारे अधिकारी व प्रशासन कारणीभूत राहील.

कार्यक्रमात वाटली जाणार दारू ?

दरम्यान, या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी हरकत घेतली. या कार्यक्रमात दारू वाटली जाणार असल्याने सांगत स्थानिकांनी या कार्यक्रमाला विरोध केला. कार्यक्रमाला ४० हजारांहून अधिक लोक उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी होईल. तसेच येणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्नदेखील निर्माण होणार आहे. तसेच या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात आवाज होणार असून स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. असे असूनही प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. रहिवासी परिसरात होणाऱ्या या  कार्यक्रमासाठी निवडलेली जागा चुकीची असल्याचे सांगत स्थानिकांनी कार्यक्रमाला विरोध केल्याचे सांगितले.

दारू विक्रीस उत्पादन शुल्क विभागाने दिला नकार

काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमात मद्यविक्रीस राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी नाकारली आहे. काकडे फार्मचे मालक सुर्यकांत काकडे यांनी स्वतः याबाबत पत्र दिले होते. तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या एका टीमने अधिक्षकांना याबाबत एक अहवाल सादर केला. संबंधित अहवाल आणि काकडे यांच्या पत्राची दखल घेऊन, कार्यक्रमाच्या ठिकाणी मद्यविक्री करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे, असे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest