पुणे जिल्ह्यात ४७ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमधून ३०३ उमेदवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल आजमावला. मात्र, ४७ हजार ६८५ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारत ‘नोटा’ला (None Ogf The Above) पसंती दिल्याचे मतमोजणीमध्ये स्पष्ट झाले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या पराभवाचा फरक 'नोटा'च्या जवळ जाणारा

पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमधून ३०३ उमेदवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल आजमावला. मात्र, ४७ हजार ६८५ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारत ‘नोटा’ला (None Ogf The Above) पसंती दिल्याचे मतमोजणीमध्ये स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या पराभवाची मते 'नोटा'च्या जवळपास जाणारी असल्याचे समोर आले आहे. टिंगरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्याकडून ४,७१० मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात तब्बल ४,२३७ मतदारांनी निवडणूक लढवत असलेला कोणताही उमेदवार न आवडल्यामुळे ‘नोटा’चे बटन दाबणे पसंत केले.

पुणे शहरात आठ, पिंपरी चिंचवडमध्ये तीन आणि उर्वरीत ग्रामीण भागात दहा असे एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहूजन समाज पक्ष आणि इतर प्रादेशिक, स्थानिक पक्ष आणि अपक्ष असे ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

चिंचवड मतदारसंघातून सर्वाधिक २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्याच मतदारसंघात सर्वाधिक ४,३१६ मतदारांनी 'वरीलपैकी कोणीही नाही' (नोटा) हा पर्याय निवडला आहे. त्यापाठोपाठ शहरातील वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक ४,२३७ मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे टिंगरे अवघ्या ४,७१० मतांनी पराभूत झाले. तिसऱ्या क्रमांकावर कोथरूड मतदारसंघातून तीन हजार मतदारांनी 'नोटा'ला मतदान केल्याचे मतमोजणीनंतर समोर आले आहे. कोथरूडमधून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवाजीनगरमधून भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवाजीनगर मतदारसंघातून सुमारे दोन हजार मतदारांनी एकही उमेदवार पसंत नसल्याने 'नोटा'ला मतदान केले आहे.

ग्रामीण भागातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात १,३७६ मतदारांनी 'नोटा' पर्यायावर विश्वास दाखविला. आंबेगाव १,१५७, खेड-आळंदी १,६९२, शिरूर २,१५७, दौंड १,२११, इंदापूर ६३४, बारामती ७७९, पुरंदर १,४८४, भोर २,७२० आणि मावळ विधानसभा मतदारसंघात २,७१५ मतदारांनी 'नोटा'ला मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात 'नोटा'ला झालेले मतदारसंघनिहाय मतदान

जुन्नर : १३७६, आंबेगाव : ११५७, खेड आळंदी : १६९२, शिरूर : २१५७, दौंड : १२११, इंदापूर : ६३४, बारामती : ७७९, पुरंदर : १४८४, भोर : २७२०, मावळ : २७१५, चिंचवड : ४३१६, पिंपरी : ४०१३, भोसरी : २६८५, वडगाव शेरी : ४२३७, शिवाजीनगर : २०४४, कोथरूड : ३१५२, खडकवासला : २९००, पर्वती : २४६१, हडपसर : २९४६, पुणे कॅन्टोन्मेंट : १७९३, कसबा : १२१३

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest