विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी
वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने (PMC) घेतला आहे. कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत असून पुण्यामध्ये सध्या कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. मात्र, शहरात एकही जेएन १ विषाणूचा रुग्ण नाही, असे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी स्पष्ट केले. (Pune News)
जगभरात कोरोना वाढतोय. चीनमध्ये सात रुग्ण आढळले आहेत. जगात आणि देशात जे एन १ व्हेरिएंट हा नवीन विषाणू आला आहे. देशात केरळमध्ये कोरोनाची सर्वाधिक वाढ असून महाराष्ट्रातही काही रुग्ण आहेत. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगून डॉ. पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ४५ कोरोना रुग्ण आहेत. जगात आणि देशात सुरू असलेली वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता पुणे महापालिका सतर्क आहे.
महाराष्ट्र सरकारने मॉकड्रील घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे आपण एक मॉकड्रील घेतले आहे. आरोग्य सेवा सतर्क आहे. कोरोनावर लागणाऱ्या सामग्रीचा साठा आहे का हे पाहायला सांगितले होते. सध्या पुण्यात सरकारी आणि खासगी मिळून १३०१ बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजनची व्यवस्था असलेले ६७४ बेड आहेत. ३९६ आयसीयू बेड आहेत. ४१ व्हेंटिलेंटर आहेत.
पुण्यात रुग्णसंख्या कमी आहे. घाबरू नये, काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्कचा वापर करा, आजारी रुग्ण असेल तर दक्षता घ्यावी. पॉझिटिव्हिटीचा दर मात्र शून्यवरून ०.८० वर गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व ओपीडींमध्ये सर्वेक्षण आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये संशयित रुग्ण सापडल्यास त्यांची तपासणी केली जाईल. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचे जिनोम सिक्वेंन्सिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पवार यांनी सांगितले की, भारतामध्ये जेएन१ या व्हेरियंटचा रुग्ण ही ७९ वर्षांची महिला असून तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापी कोविड प्रतिबंधांसाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. आजपर्यंत पुणे शहरात एकही जेएन १ व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही.
विमानतळावर कोरोना तपासणी
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने विमानतळावर येणऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसनविकार या आजारांना तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. सिंधुदुर्गमध्ये बुधवारी कोविड-१९ चे जेएन १ चा पहिला रुग्ण सापडला अहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४१ वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.