उदंड झाली फार्मसी महाविद्यालये! जागा रिक्त, चालविणे अवघड
फार्मसीच्या कॉलेजांच्या (Colleges of Pharmacy) जागांमध्ये भरमसाट वाढ झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशांवर विपरित परिणाम झाला आहे. विद्यार्थी संख्या कमी आणि खर्च जास्त यामुळे महाविद्यालय चालवायचे कसा हा पश्न संस्थाचालकांना पडला आहे. आता तरी नवीन महाविद्यालयांना परवानगी देणे थांबवा अशी मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार, राज्यातील पाच नामांकित महाविद्यालयांमध्ये 'शून्य' विद्यार्थी असून फार्मसीच्या १४ हजार ३६२ जागा रिक्त आहेत.राज्यातील बी. फार्मसीच्या पाच कॉलेजांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. २१ कॉलेजांमध्ये दहापेक्षा कमी आणि ७१ कॉलेजांमध्ये ३०पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ही बहुसंख्य महाविद्यालये खासगी असल्याने विद्यार्थी संख्येअभावी त्या कॉलेजांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे.
यावर्षी राज्यात फार्मसीच्या 57 नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फार्मसी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या ४५३ वर पोहोचली आहे. या महाविद्यालयांतील जागांची संख्या गेल्या वर्षीच्या 36,888 वरून वाढून यंदा 42,794 झाली आहे. त्याच वेळी, फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र घटली आहे. गेल्या वर्षी फार्मसीमध्ये एकूण 32,137 विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला होता. यंदा ही संख्या 28,432 झाली आहे. परिणामी 14,362 जागा रिक्त राहिल्या आहेत.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या उपाध्यक्ष प्रा. मंजिरी घरत म्हणाल्या, राज्यात एका वर्षात महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने जागा रिक्त राहणे अपेक्षितच होते. राज्यात इतक्या महाविद्यालयांची गरज आहे का? याचा अभ्यास न करताच हा निर्णय घेतल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त फार्मसी महाविद्यालये आहेत. अनेक विद्यार्थ्यांना नवीन फार्मसी महाविद्यालयांची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांना प्रवेश घेता आला नाही. मुळात राज्याला आणि आरोग्य यंत्रणेला एवढ्या फार्मासिस्टची गरज आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे.
ऑल इंडिया फार्मसी टीचर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मिलिंद उमेकर म्हणाले, राज्यातील नवीन फार्मसी महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने त्यांनी तेथे प्रवेश घेतला नाही. दुसरीकडे, महाविद्यालयांमधील प्रवेशाची टक्केवारी वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालून शिक्षणाचा दर्जा राखला पाहिजे. वैद्यकीय प्रवेशासोबतच फार्मसीचे प्रवेश सुरू झाले पाहिजेत, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस किंवा बीएएमएसमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांना बी.फार्मसी आणि नंतर डी. फार्मसीमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. तरीही राज्य स्तरावर नवीन फार्मसी कॉलेजच्या परवानगीसाठी मर्यादा असावी.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.