मेट्रोची महापालिकेवर दादागिरी

झिकाचा फैलाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. पुणे महापालिका त्याविरुद्ध उपाययोजना करत आहे. डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू असून त्या ठिकाणी पाणी साचले आहे.

Pune Metro

मेट्रोची महापालिकेवर दादागिरी

पुणे शहरात झिकाचा फैलाव वाढत असूनही बांधकामांच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यावर फवारणी करण्यास मज्जाव

झिकाचा फैलाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. पुणे महापालिका त्याविरुद्ध उपाययोजना करत आहे. डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू असून त्या ठिकाणी पाणी साचले आहे. मात्र, या ठिकाणी फवारणी करण्यास मेट्रोकडून मज्जाव होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महामेट्रोला पत्र लिहून विनंती करण्याची वेळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.

सध्या कसबा-विश्रामबागवाडा प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या शनिवार पेठ, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या चार ठिकाणी महामेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. या कार्यालयातील कर्मचारी वेळोवेळी ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार फवारणी आणि फॉगिंगचे काम करत आहेत. मात्र, महापालिकेचे कर्मचारी मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी गेल्यावर त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारला जात आहे. यासंदर्भात महापालिकेने मेट्रोला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘मेट्रोच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक बेजबाबदार असून त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांचा वेळही वाया जात आहे.’’

नागरिकांनीच अनेकदा तक्रारी करून बांधकामाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याने परिसरात फवारणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या  आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना महामेट्रोच्या बांधकाम स्थळावर सर्वेक्षण सुरू केले होते. मात्र, मेट्रोने त्याला नकार दिला.

डासांच्या उत्पत्तीच्या संभाव्य जागा असलेल्या बांधकाम साइट्सच्या भागातील रहिवाशांनी केलेल्या तक्रारींनुसार या ठिकाणी तसेच परिसरात फवारणी करणे अनिवार्य आहे. या तक्रारींवर पुणे महापालिकेने तातडीने कार्यवाही केली होती. परंतु सर्वेक्षणासाठी गेलेल्या पीएमसी कामगारांना मेट्रोकडून परत पाठवण्यात आले. यानंतर आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी आणि प्रजनन स्थळे ओळखण्यासाठी आणि ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना महामेट्रोला पत्र लिहावे लागले.  

मेट्रो स्थानकाच्या सर्व बांधकाम साईट्सवर बांधकाम साहित्य आणि राडारोडा पडलेला आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी  पावसाचे पाणी साचले आहे आणि डासांची उत्पत्ती वाढली आहे. मेट्रोकडून याबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.  मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने झिकासह डेंगी/मलेरियाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने आता पत्र पाठविले आहे.

यासंदर्भात ‘सीविक मिरर’सोबत बोलताना सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष  विवेक वेलणकर म्हणाले, “यामध्ये मेट्रो आणि महापालिका दोघांचीही चूक आहे. एकाला दोष देता येणार नाही.  मेट्रोने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मनाई करायला नको होती. फवारणीची गरज आहे की नाही, याची खात्री मेट्रोनेच करायची होती. मेट्रोकडे अतिरिक्त सुरक्षा उपकरणेदेखील असली पाहिजे.’’

सामाजिक कार्यकर्ते  संजय शितोळे म्हणाले, ‘‘मेट्रो अधिकाऱ्यांनी फवारणीला मनाई केल्याने स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मेट्रोकडे अतिरिक्त सुरक्षारक्षक असण्याची गरज आहे.’’

महापालिकेच्या प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळिवंत म्हणाल्या, “झिका विषाणूच्या वाढीमुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आम्ही महापालिका कर्मचाऱ्यांना मेट्रोच्या बांधकामाजवळची डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून आवश्यक त्या ठिकाणी फवारणीसाठी पाठविले होते. मात्र,  सुरक्षारक्षकांनी कर्मचाऱ्यांना  प्रवेश नाकारला. त्यामुळे आम्हाला मेट्रो अधिकाऱ्यांना फॉगिंग आणि फवारणीसाठी परवानगी देणारे  पत्र लिहावे लागले. मेट्रोकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.”

यासंदर्भात ‘सीविक मिरर’ने महामेट्रोचे कार्यकारी संचालक (जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ‘‘महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेबद्दल मला माहिती नाही. मात्र मेट्रोच्या ठिकाणांजवळ पाणी साचण्याची शक्यता फारच कमी आहे. महापालिकेने आम्हाला अगोदरच कळवायला हवे होते. त्यामुळे आम्हाला आवश्यक गोष्टींची पूर्तता करून परवानगी देणे शक्य झाले असते. बांधकामाच्या ठिकाणी जाणे धोकादायक ठरू शकते. मात्र, महापालिकेकडून पत्र मिळाल्यावर त्यांना आवश्यक परवानगी दिली जाईल,’’ असे ते म्हणाले.

झिका विषाणूच्या वाढीमुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मेट्रोच्या बांधकामाजवळची डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून तेथे फवारणीसाठी कर्मचाऱ्यांना पाठवले होते. मात्र, तेथील सुरक्षारक्षकांनी कर्मचाऱ्यांना  प्रवेश नाकारला. त्यामुळे फॉगिंग आणि फवारणीसाठी परवानगी देणारे पत्र आम्हाला मेट्रो अधिकाऱ्यांना लिहावे लागले.

- डॉ. कल्पना बळिवंत, 

प्रभारी आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेबद्दल मला माहिती नाही. मेट्रोच्या ठिकाणांजवळ पाणी साचण्याची शक्यता फारच कमी आहे. तपासणीबाबत महापालिकेने आम्हाला अगोदरच कळवायला हवे होते. महापालिकेकडून पत्र मिळाल्यावर त्यांना आवश्यक परवानगी दिली जाईल.

- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक (जनसंपर्क), महामेट्रो

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest