बहिण-भावाचे प्रेम आणखी वाढणार, पीएमपीएमएलकडून ९६ जादा बसेसचे नियोजन

"रक्षाबंधन" सणानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बुधवार (दि. ३० ऑगस्ट) पुणे परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दैनंदिन बस संख्येपेक्षा ९६ जादा बसेस धावणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 28 Aug 2023
  • 06:44 pm
PMPML : बहिण-भावाचे प्रेम आणखी वाढणार, पीएमपीएमएलकडून ९६ जादा बसेसचे नियोजन

संग्रहित छायाचित्र

यंदा रक्षाबंधन सण येत्या बुधवारी आहे. "रक्षाबंधन" सणानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बुधवार (दि. ३० ऑगस्ट) पुणे परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दैनंदिन बस संख्येपेक्षा ९६ जादा बसेस धावणार आहेत.

दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करतात. या कारणास्तव दरवर्षीप्रमाणे परिवहन महामंडळाने रक्षाबंधनच्या दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय व्हावी. यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या नियोजित १८३७ बसेस व्यतिरिक्त जादा ९६ बसेस अशा एकूण १९३३ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जादा बसेस या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगांव, राजगुरूनगर व देहूगांव इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत.

याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रण करण्याकामी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे, बसेसची नोंद घेवून जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest