Pankaj Sharma : अंतर्मुख करणारे वर्ष!

राजकीय उलाढाली, आर्थिक-सामाजिक अस्थिरता अशा अनेक घटनांचे २०२४ हे वर्ष साक्षीदार होते. वर्षभरात घडलेल्या घटना आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 31 Dec 2024
  • 12:25 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हे संपूर्ण वर्ष खूपच वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी, चढ-उतारांनी भरलेले होते. भारतासह जगाच्या दृष्टीने प्रगती आणि गौरवाच्या उच्च शिखरांपासून, युद्धामुळे मानवी जीवनाला निर्माण झालेला धोका,  त्यामधून झालेल्या नुकसानीचे परिणाम, राजकीय उलाढाली, आर्थिक-सामाजिक अस्थिरता अशा अनेक घटनांचे २०२४ हे वर्ष साक्षीदार होते. वर्षभरात घडलेल्या घटना आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या.

या वर्षी, भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये क्षमता सिद्ध करीत यश खेचून आणले. इस्रोच्या सदस्यांनी अंतराळ संशोधनाची मोहीम आणखी पुढे नेली. भारतीय क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेष चमक दाखवली. चित्रपट निर्मात्यांनी प्रादेशिक चित्रपटांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपला झेंडा फडकावला. शासकीय स्तरावर अधिकाऱ्यांसह जबाबदार व्यक्तींनी आपल्या मुत्सद्देगिरीचा वापर करीत जागतिक नेत्यांसोबत कूटनीतिक संबंध अधिक मजबूत केले. महाराष्ट्रात राजकीय विश्वात अनेक नवी समीकरणे तयार झाली. युती-आघाडीचे संदर्भ बदलत गेले. भारतात लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून जनतेने पुनर्स्थापित केले. या घटनांसोबतच ज्यावर अधिक लक्ष दिले गेले पाहिजे आणि कार्यवाही व्हायला हवी अशा अनेक घटना घडल्या. भारतामधील विविध प्रदेशांमध्ये झालेल्या भूस्खलन, ढगफुटी, मोठ्या प्रमाणावरील पूर, उष्णतेची लाट आणि थंडीची लाट अशा आपत्तींद्वारे हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम जगासमोर आले. देशातील मोठ्या शहरांमधील ढासळलेली हवेची गुणवत्ता ... त्यामुळे मानवजातीला निर्माण झालेला धोका यामुळे आपण हवामान बदलासंदर्भात नेमकी काय धोरणे आखतो आणि त्याची अंमलबजावणी कशी करतो याविषयी चिंता निर्माण झाली.

मानवी संघर्ष, क्रूर जागतिक युद्धे, अनिश्चित आर्थिक परिस्थिती आदी मुद्दे संपूर्ण पिढीसाठी भविष्यात धोका निर्माण करणारे आहेत. या वर्षात केवळ नकारात्मकच घटना घडल्या आहेत असे नाही. जागतिक मंदीच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेने आपला वेगळा ठसा उमटवला. विशेषत: व्यावसायिक  क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या स्टार्ट-अप्समुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. तरुण उद्योजकांनी क्रियाशील धोरणे राबवली. ज्यामुळे शिक्षण, शाश्वत ऊर्जा, नवोन्मेषक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी उपलब्ध झाली. आपली शालेय आणि व्यावसायिक व्यवस्था आता अधिक सर्वसमावेशक बनत चालली आहे. या क्षेत्रातील सर्व घटकसुद्धा या समावेशकतेला अधिक प्राधान्य देतील, याविषयी मी अजूनही आशावादी आहे. आपली शिक्षणप्रणाली अधिक समावेशक आणि स्वीकारार्ह बनवून समानतेला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये मला एक सकारात्मक आशा दिसते आहे. हा बदल घडवून आणण्यासंदर्भात आवश्यक ते सर्व करण्याची आमची तयारी आहे. मी अद्यापही हार मानायला तयार नाही.

या संपूर्ण वर्षाने आपल्यावर स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे. आपल्याला अमूल्य धडे दिले आहेत. नवीन संधी दिल्या आहेत. तसेच, दरवर्षीप्रमाणेच आपली दृढता आणि लवचिकतादेखील तपासून पाहिली. संकटाच्या क्षणी न डगमगता ठामपणे उभे राहणे, नावीन्याचा शोध घेणे, क्षमतांचा विस्तार करणे, आपण जे स्वीकारले आहे त्यावर विश्वास ठेवून त्याच्या सीमा अधिक विस्तारित करीत जाणे हेदेखील या वर्षाने शिकवले. मी नम्रतेने सांगू इच्छितो की, आमची सर्व शक्तिस्थाने आम्हाला ज्ञात आहेत. तसेच, आम्हाला संभाव्य अडथळे व आमच्या मर्यादांचीही जाणीव आहे. तरीदेखील ठामपणे सांगू इच्छितो की, येत्या वर्षात आम्ही अधिक चांगली सेवा देऊ. लोकहित संरक्षित करण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करू. तथापि, पुढील ३६५ दिवसांत नेमकी कोणती भूमिका आपण बजावणार आहात, असा आपुलकीचा प्रश्न करीत आहे.  प्रगती आणि समृद्धीच्या आधारे भरभराट करणारे राष्ट्र सक्रियपणे घडवणारे तुम्ही असाल की, निष्क्रियपणे निरीक्षण करणारे असाल, असा माझा प्रश्न आहे. चला आपण सर्व मिळून राष्ट्रउभारणीत हातभार लावूयात. मला आशा आहे की, या आगामी वर्षात तुम्ही तुमच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यालाही अधिक प्राधान्य द्याल. प्रामाणिक आशावादाच्या मार्गावर चालत राहाल. 

मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो! २०२५ तुमची मोठ्या आशेने आणि उत्साहाने वाट पाहात आहे!

पंकज शर्मा,
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,
‘पुणे टाइम्स मिरर’ आणि ‘सीविक मिरर’

Share this story

Latest