ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् आयोजित त्रिवेणी मैफलीत व्हायोलीन वादन करताना पंडित मिलिंद रायकर, सतार वादन करताना नेहा महाजन, सरोद वादन करताना अनुपम जोशी
पुणे : सतारीचे सुमधुर झंकार, मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे सुरेल सरोद वादन आणि गायकी अंगाने सादर झालेल्या व्हायोलीनच्या आर्त स्वरातून भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाली. सतार, सरोद आणि व्हायोलीन या तिन्ही वाद्यांच्या वादनातून त्रिवेणी संगम साधला गेला.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशनच्या स्वरदालनात ‘त्रिवेणी’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात नेहा महाजन यांचे सतार, अनुपम जोशी यांचे सरोद तर पंडित मिलिंद रायकर यांचे व्हायोलीन वादन झाले. रसिकांनी मैफलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या सादरीकणाला भरभरून दाद दिली.
नेहा महाजन यांनी भीमपलास रागातील दोन बंदिशी सादर केल्या. आपले गुरू सतार वादक उस्ताद जुनैद खान यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेल्या या बंदिशी बिनकर घराण्याचे उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांनी रचलेल्या होत्या. सुरेल धून ऐकवून नेहा महाजन यांनी मैफलीची सांगता केली. अनिरुद्ध शंकर यांनी तबला तर मानसी पोतदार यांनी तानपुरा साथ केली.
अनुपम जोशी यांनी सरोद वादनाची सुरुवात हेमंत रागात आलाप, जोड, झाला सादर करून केली. अतिशय सुमधुर समजला जाणारा हेमंत राग उलगडून मांडताना अनुपम जोशी सरोद मैहर घराण्याचय्ा सरोद वादनातील बारकावे, वैशिष्ट्ये दर्शविल्याने रसिक मोहित झाले. त्यानंतर पुरिया कल्याण रागातील विलंबित तीन व द्रुत तीनताल अतिशय प्रभावीपणे सादर केला. पंडित राजीव तारानाथ आणि पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे मार्गदर्शन लाभलेल्या अनुपम जोशी यांच्याकडे आजच्या पिढीतील आश्वासक सरोद वादक म्हणून पाहिले जाते. महेशराज साळुंखे यांनी समर्पक तबला तर वैष्णवी सोनार यांनी तानपुरा साथ केली.
पंडित मिलिंद रायकर यांच्या आत्मभान विसरायला लावणाऱ्या व्हायोलीनच्या सुरांनी त्रिवेणी मैफलीचा कळसाध्याय गाठला. पंडित रायकर यांनी रागांचा राजा समजल्या जाणाऱ्या आणि गंभीर प्रकृतीच्या राग मालकंसचे ऐकवलेले स्वर रसिकांच्या काळजाला भिडले. अनेक दिग्गज कलाकारांसह गानसरस्वती पद्मभूषण किशोरी आमोणकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या पंडित रायकर यांच्या व्हायोलीन वादनातील आर्त सुरांनी रसिकजन मंत्रमुग्ध झाले. पंडित विश्वनाथ शिरोडकर यांनी बहारदार तबला साथ केली तर नुपूरा जोशी-भिडे यांनी स्वरमंडल आणि मानसी पोतदार यांनी तानपुरा साथ केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या संस्थापक संचालिका चेतना कडले, विनता गांगुली, विदुर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले. कलाकारांचा सत्कार चेतना कडले, विनता गांगुली, प्रकाश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन नमिता राऊत यांनी केले.