पालकांच्या आंदोलनानंतर पुणे मनपाच्या शाळेत ७ शिक्षकाची नियुक्ती !
वारजे माळवाडी (Warje Malwadi)येथील महापालिकेच्या कै. श्यामराव श्रीपती बराटे (Kai Shyam Rao Shripati Barate) इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पालकांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिकेचा (PMC) शिक्षण विभाग (Department of Education) खडबडून जागा झाला. त्यानंतर आंदोलन होण्यापूर्वीच या शाळेत सात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालक व माजी लोकप्रतिनिधींनी 'शिक्षक द्या; अन्यथा शाळेला टाळे ठोकू' असा इशारा शिक्षण विभागाला दिला होता. त्यानुसार 31 ऑक्टोबर रोजी पालक शाळेत आंदोलन करण्यासाठी जमा झाले असता सात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंद व्यक्त करीत हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
आगामी काळात शिक्षकांची संख्या कमी केली, तर कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी दिला आहे. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व माजी नगरसेवक दिलीप बराटे, माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ, माजी नगरसेविका सायली वांजळे-शिंदे आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.