पुण्यात आणखी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या
पुण्यात पाच ते सहा दिवसांपुर्वीच एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा विश्रांतवाडी येथे अभ्यासिकेमध्ये गळफास घेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले आहे. अवघ्या आठ दिवसाच्या आत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
विजय नांगरे (वय २१, रा. मोहा ता. गंगाखेड जिल्हा परभणी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याने सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असणाऱ्या पंख्याला गळफास लावून घेतला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नांगरे हा मुळचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मोहा या गावचा रहिवासी आहे. तो पुण्यातील मॉडर्न विद्यालयात कलाक्षेत्राच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत होता. आज सकाळच्या सुमारास त्याने वसतिगृहातील अभ्यासिकेत गळफास घेतला.
आत्महत्येनंतर पोलीसांना वसतिगृहात सुसाईट नोट सापडली आहे. पोलीसांनी ही सुसाईट नोट ताब्यात घेतली आहे. विजय गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्यातूनच त्याने ही आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. या अगोदर देखील विजयने भीमा नदीमध्ये उडी घेत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, पाच ते सहा दिवसापुर्वीच राज गर्जे नावाच्या २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गोखलेनगर परिसरातील शिवाजी हौसिंग सोसायटीत असलेल्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या पी. डी. कारखानीस या वसतिगृहात त्याने आत्महत्या केली होती. अवघ्या आठ दिवसाच्या आतच विजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.