अंकिता जोशी यांचा रंगतदार 'मुलतानी'; सवाईच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र रंगले
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात संपन्न होत आहे. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद यांच्यासह प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर आवर्जून उपस्थित होते.
अंकिता जोशी यांनी आपल्या गायनाची सुरवात राग 'मुलतानी'ने केली. 'गोकुल गाव का छोरा' या पारंपरिक रचनेतून आणि त्याला जोडून 'अजब तेरी बात' या बंदिशीतून तसेच 'आये मोरे साजनवा' या द्रुत रचनेतून त्यांनी रागमांडणी साधली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील झरीना या व्यक्तिरेखेसाठी पार्श्वगायन केलेली 'दिल की तपिश' ही राग किरवाणीवर आधारित रचना त्यांनी सादर केली. रसिकांनी या रचनेला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. अंकिता यांनी 'नाम गाऊ, नाम ध्यावू, नामे विठोबाला पाहू' या अभंगाने गायनाची सांगता केली. रसिकांच्या प्रतिनिधी या नात्याने अपर्णा कामतेकर यांच्या हस्ते यावेळी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर यांनी, संवादिनीवर अभिनय रवंदे तसेच खंजिराची साथ धनंजय कंधारकर यांनी व टाळांची साथ माऊली टाकळकर यांनी केली. तानपुरा साथ मानसी महाजन आणि अदिती रवंदे यांनी केली.'हा स्वरमंच माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. माझे गुरू संगीतमार्तंड पं. जसराजजी यांना प्रथम भेटण्याचे भाग्य मला इथेच लाभले, त्यामुळे या स्वरमंचाशी माझे विशेष नाते आहे. तिथे गानसेवा रुजू करण्याची संधी मिळाली, हे भाग्य आहे, अशा भावना अंकिता यांनी सुरवातीला व्यक्त केल्या.
सवाईच्या दुसऱ्या दिवशीचे दुसरे सत्र प्रसिद्ध सतारवादक पं. पार्थ बोस यांच्या बहारदार सतारवादनाने रंगले. मैहर घराण्याचा वारसा जपणाऱ्या पं. पार्थ यांनी वादनासाठी राग मारवा निवडला होता. आलाप, जोड, झाला या क्रमाने त्यांचे वादन रंगत गेले. राग खमाज मधील गतमाला (एकाच तालात विविध बंदिशी) सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर अप्रतिम साथ केली.रसिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मला इथे येण्याचा खूप आनंद झाला आहे. मी बंगाली आहे, पण संगीत ही ह्दयाची भाषा आहे. या महोत्सवाचे नाव इतके मोठे आहे, की माझ्यासाठी हे केवळ संगीत संमेलन नाही तर हा सिद्ध मंच आहे, हे तीर्थ आहे.”
त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. उपेंद्र भट यांचे गायन झाले. त्यांनी राग शुद्धकल्याण मध्ये विलंबित एकतालात 'तुमबिन कौन' ही रचना आणि 'रस भिनी भिनी' ही बंदिश सादर केली. पं. भीमसेनजी तसेच पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाल्यानिमित त्यांना अभिवादन म्हणून त्यांनी 'इंद्रायणी काठी' ही गाजलेली भक्तिरचना सादर करत आपला आदरभाव व्यक्त केला. त्यांना हार्मोनियमवर निरंजन लेले, तबल्यावर मंदार पुराणिक, माऊली फाटक (पखवाज), विश्वास कळमकर (टाळ), तसेच देवव्रत भातखंडे, धनंजय भाटे व अनमोल थत्ते यांनी तानपुरा व स्वरसाथ केली.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पं. पार्थ बोस यांच्या वादनापूर्वी एक आठवण सांगितली. 'दोन हजार साली पार्थ यांचे वादन आमच्या घरी पं. भीमसेनजी यांच्या उपस्थितीत झाले होते. तेव्हा मी तुम्हाला सवाईमध्ये वादनासाठी बोलवेन, असे बाबा म्हणाले होते. तो योग आज जुळून आला आहे आणि बाबांनी दिलेल्या वचनाची पूर्ती होत आहे,' असे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
विख्यात गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरेल गायनाने 'सवाई' च्या दुसऱ्या दिवसाचा उत्तरार्ध स्मरणीय झाला.जयपूर अत्रौली घराण्याचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या विदुषी अश्विनी भिडे यांनी सुरवातीला राग काफी कानडा मांडला. विलंबित त्रितालातील 'लायी रे मदपिया' ही पारंपरिक बंदिश आणि त्याला जोडून हवेली संगीतातील 'कान्हकुवर के करपल्लव पर मानो गोवर्धन नृत्य करे' ही रचना द्रुत त्रितालात त्यांनी सादर केली. अतिशय शांत पद्धतीने रागविस्तार हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रसिकांना आपल्या गायनातून त्यांनी मंत्रमुग्ध केले.त्यानंतर अश्विनीताईंनी राग गोधनी मध्ये मध्यलय झपतालातील पारंपरिक रचना सादर केली. द्रुत एकतालात 'पिहरवा मोरे घर आये' ही बंदिशही त्यांनी पेश केली. 'सैया निकस गये' या रचनेने त्यांनी 'सवाई' च्या दुसऱ्या दिवसाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) तसेच स्वरांगी मराठे आणि शमिका भिडे यांनी स्वर व तानपुरा साथ केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.