राममंदिरानंतर आता पुणेकरांना पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे : सुनील देवधर
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर (Ram temple) उभे राहू शकले असून, ज्याप्रमाणे देशाला राम मंदिर मिळाले, त्याप्रमाणे पुणेकरांना देखील पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे असा निर्धार भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केला. रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी सुनील देवधर यांच्या नेतृत्वात पुण्यात ‘नमो पुणे अभिवादन बाईक रॅली’चे (Namo Pune abhivadan Bike Rally')आयोजन करण्यात आले होते, त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या बाईक रॅलीत ३ हजारांहून बाईकधारक व ५ हजारांहून अधिक पुणेकर रामभक्त सहभागी झाले होते. त्यात महिला व युवतींची लक्षणीय संख्या होती.
पुण्यातील नागरी समस्यांचे निराकरण, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध असून, पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प व शपथ घेवूया असे, सुनील देवधर यांनी याप्रसंगी बोलताना केले. त्याचप्रमाणे देशाला भव्य राम मंदिर दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार देखील व्यक्त केले.
भाजप कार्यालय, कृष्णसुंदर गार्डन, डीपी रोड, एरंडवणे येथून या रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी भाजपचे युवा नेते कुणाल टिळक, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप शहर चिटणीस महेश पवळे आणि दिनेश होले यांच्यासह हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला.
डी पी रोडवरून रॅली म्हात्रे पूल – शास्त्री रोड- माधवराव पेशवे रोड – बाजीराव रोड – शनिवार वाडा – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – एफ. सी. रोड – ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणी येऊन सांगता झाली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी राम खिचडीचा देखील आस्वाद घेतला.
‘नमो पुणे अभिवादन बाईक रॅली’साठी पुणेकरांनी लक्षणीय प्रतिसाद दिला, ज्यामाध्यमातून देशाला राम मंदिर दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले. सर्व पुणेकरांनी यावेळी नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले. यावेळी समृद्ध पुणे, विकसित भारत अशा घोषणा देत ही भव्य बाईक रॅली संपन्न झाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.