सुमारे ३५० महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात, पुणे विद्यापीठाचा कारवाईचा निर्णय

महाविद्यालये ऑपरेशनल कमतरता दूर करण्यासाठी विद्यापीठाकडे बॉण्ड सादर करतात. मात्र, या त्रुटी दूर करण्यात अपयशी ठरलेल्या महाविद्यालयांवर आता कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 3 Jul 2023
  • 11:33 am
Pune University : सुमारे ३५० महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात, पुणे विद्यापीठाचा कारवाईचा निर्णय

पुणे विद्यापीठ

त्रुटी दूर करण्यात अपयशी ठरल्याने घेतला निर्णय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सुमारे ३५० महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात आली आहे. दरवर्षी, ही महाविद्यालये ऑपरेशनल कमतरता दूर करण्यासाठी विद्यापीठाकडे बॉण्ड सादर करतात. मात्र, या त्रुटी दूर करण्यात अपयशी ठरलेल्या महाविद्यालयांवर आता कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहे.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. यात महाविद्यालयांच्या संलग्नतेबाबत चर्चा झाली. त्यानंतर या सर्व विषयांवर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या आठवड्यात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी समितीची घोषणा करणार आहेत.

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. यात पुणे जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालये आहेत. ही महाविद्यालये दरवर्षी विद्यापीठाकडून संलग्नता घेतात. ही संलग्नता घेण्यासाठी त्यांना ५०० रुपयांच्या बंधपत्रावर महाविद्यालयांत प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांची पदे भरण्यासोबतच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा सहा महिन्यांत पुरविण्याचे लिहून देण्यात येते.

मात्र, प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे या महाविद्यालयांबाबत विद्यापीठाने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. गरज भासल्यास या महाविद्यालयांची संलग्नता काढून टाकण्यात येईल. या महाविद्यालयांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्या परिषदेच्या सदस्यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest