हौशी मेंडोलिन वादकांनी एकत्र येत भरवला मेंडोलिन महोत्सव
पुणे : मेंडोलिन या मूळच्या इटलीतील वाद्याने भारतीय चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून भारतीय संगीत रसिकांच्या मनात विशेष घर करुन आहे. परंतु या मेंडोलिन वाद्य वाजविणारे वादक भारतामध्ये अतिशय कमी आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या अजून कमी होत आहे. या मेंडोलिन वाद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मेंडोलिन लव्हर्सच्या माध्यमातून हौशी वादकांनी एकत्र येत ७ व्या मेंडोलिन महोत्सवाचे आयोजन केले.
कर्वे रस्त्यावरील प्रेसिडेंट हॉटेल येथे या मेंडोलिन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला पुण्यासह देशाच्या विविध भागातील ४० पेक्षा अधिक मेंडोलिन वादकांनी सहभाग घेतला. भारतीय सिनेसृष्टीतील ख्यातनाम मेंडोलिन वादक तपस रॉय यांनी उपस्थित मेंडोलिन वादकांना मार्गदर्शन केले. मेटाफर अलॉईज, कुबेरा मनी बेस फायनान्शिअल सर्विसेस यांचे सहकार्य महोत्सवाला मिळाले.
तपस रॉय म्हणाले, मेंडोलिन हे अतिशय सुंदर वाद्य आहे. चित्रपटांतील अनेक गाजलेल्या गीतांमध्ये हे वाद्य वाजविले आहे. परंतु हे वाद्य वाजविणारे वादक कमी होत आहेत. अनेकांना मेंडोलिन हे वाद्य माहित नाही. त्यामुळे ज्यांना वाद्य वाजवता येते त्यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून आपले वादन लोकांपर्यंत पोहोचवावे.
मेंडोलिन लव्हर्स या संस्थेचे चेतन देशपांडे म्हणाले, या कार्यक्रमासाठी देशभरातून मेंडोलीन प्रेमी / वादक दरवर्षी येतात. यावर्षी देशभरातून ४० हुन अधिक कलाकारांनी मेंडोलीन वाद्य वाजवून आपली अनोखी कला सादर केली. मेंडोलिन हे वाद्य पूर्वीपासून आजपर्यंत हिंदी सिनेसंगीतात वापरत आहेत. लंडन ठुमकदा... दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ,बाजीराव मस्तानी, अशा बॉलिवूड गाण्यांवर उपस्थितांनी मेंडोलिन वादन केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.