वीजबिल ‘तत्पर’ न भरणारे २६ लाख ग्राहक ६.६१ कोटींच्या सवलतीपासून स्वतःहूनच वंचित

कोट्यवधी रूपयांची सवलत घेण्यासाठी लघु व उच्चदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वीजग्राहकांकडूनच दुर्लक्ष केले जात आहे. यात पुणे जिल्ह्यातील तब्बल २६ लाख ७७ हजार वीजग्राहक दरमहा सुमारे ६ कोटी ६१ लाख रुपयांच्या सवलतीपासून स्वतःहूनच वंचित आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 30 Aug 2023
  • 04:41 pm
 electricity bills  : वीजबिल ‘तत्पर’ न भरणारे २६ लाख ग्राहक ६.६१ कोटींच्या सवलतीपासून स्वतःहूनच वंचित

संग्रहित छायाचित्र

वीजबिलांत सवलत असूनही पुणे जिल्हयातील स्थिती

दरमहा वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास महावितरणकडून एक टक्का सवलत दिली जाते. मात्र कोट्यवधी रूपयांची सवलत घेण्यासाठी लघु व उच्चदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वीजग्राहकांकडूनच दुर्लक्ष केले जात आहे. यात पुणे जिल्ह्यातील तब्बल २६ लाख ७७ हजार वीजग्राहक दरमहा सुमारे ६ कोटी ६१ लाख रुपयांच्या सवलतीपासून स्वतःहूनच वंचित आहे. वीजबिलांचा तत्पर भरणा करण्यासाठी सात कार्यालयीन दिवसांची मुदत असूनही या सवलतीपासून वीजग्राहक वंचित राहत असल्यची स्थिती आहे.

महावितरणकडून वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. वीजबिल तत्पर भरण्याची (प्रॉम्ट पेमेंट) तारीख संबंधित बिलामध्ये नमूद केली जाते. पुणे जिल्ह्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात लघुदाब वर्गवारीमध्ये ३८ लाख ३९ हजार ३४४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक आहेत. धक्कादायक म्हणजे यातील २६ लाख ७५ हजार २७० लघुदाब वीजग्राहक दरमहा ५ कोटी ११ लाख रुपयांच्या सवलतीपासून स्वतःहूनच वंचित राहत आहेत. केवळ ११ लाख ६४ हजार ग्राहक बिलांचा तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) करीत असल्याने त्यांची दरमहा २ कोटी ८२ लाख रुपयांची बचत होत आहे. यासोबतच उच्चदाब वर्गवारीमध्ये प्रामुख्याने औद्योगिकसह एकूण ६ हजार ५३३ वीजग्राहक आहेत. त्यापैकी १७५५ वीजग्राहक १ कोटी ५० लाख रुपयांची सवलत घेत नसल्याचे समोर आले आहे.

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले की, ‘वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजना, ऑनलाइन वीजबिल भरणा व प्रॉम्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेतल्यास शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा किमान वीस रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. दोनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची तर महिना तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी या तिन्ही सवलतींचा लाभ घ्यावा.’

वीजग्राहकांनी तत्पर बिल भरल्यास (प्रॉम्ट पेमेंट) प्रत्येक बिलासाठी एक टक्का सवलत दिली जाते. तसेच वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. महावितरणचे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ग्राहकांना क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे सोयीने व सुरक्षितपणे घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाल्यास छापील कागदी वीजबिलाऐवजी ते 'ई-मेल' 'एसएमएस'ने लगेचच संबंधित ग्राहकांना पाठविण्यात येते. सोबतच प्रतिबिलात १० रुपये सवलत दिली जाते. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest