100 crore scam : पुण्यात १०० कोटींचा घोटाळा; 'ईडी'कडून दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल

लोकांना दर महिन्याला दोन ते तीन टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवीत बनावट बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारून ही फसवणूक करण्यात आली. व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे. यासोबतच 'फॉरेस्ट ट्रेडिंग'च्या नावाखाली 'काना कॅपिटल' कंपनी बनवून लोकांना ट्रेडिंग करायला लावून आर्थिक गंडा घालण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 11 Oct 2023
  • 11:17 am

पुण्यात १०० कोटींचा घोटाळा; 'ईडी'कडून दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल

'ईडी'कडून आयपीईएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यांविरुद्ध गुन्हा

लक्ष्मण मोरे

पुणे : पुण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक करून तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. हा सर्व पैसा हवाला रॅकेट आणि शेल कंपन्यांच्या मार्फत विदेशात आणि विशेषत: दुबईला पळविण्यात आला. अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना दर महिन्याला दोन ते तीन टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवीत बनावट बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारून ही फसवणूक करण्यात आली. व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे. यासोबतच 'फॉरेस्ट ट्रेडिंग'च्या नावाखाली 'काना कॅपिटल' कंपनी बनवून लोकांना ट्रेडिंग करायला लावून आर्थिक गंडा घालण्यात आला. हा  सर्व गोरख धंदा कंपनीचे संचालक दुबईमध्ये बसून करीत असल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार २०२० पासून आजवर घडला.

विनोद तुकाराम खूटे, संतोष तुकाराम खूटे, किरण पितांबर अनारसे, मंगेश सिताराम खूटेअजिंक्य बडधे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध भादवि कलम ४२०, ४७१, ३४, १२० ब अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 'ईडी'चे संचालक रत्नेशकुमार भुवनेश्वर कर्ण (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज जवळ असलेल्या निर्माण विवा सोसायटी मध्ये घडला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २०२० साली व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्या सुरू केल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना दरमहा दोन ते तीन टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखविले. चेन मार्केटिंग सारखी पॉन्झी स्कीम चालवीत लोकांकडून कोटींवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. गुंतवणुकीचे पैसे स्वत:च्या खात्यात न घेता त्याकरिता बनावट खाती विविध बँकांमध्ये उघडण्यात आली. या बनावट बँक खात्यांचा वापर करून त्यावर गुंतवणूक स्वीकारण्यात आली. गुंतवणूकदारांना कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले. अधिक कमिशन हवे असल्यास अन्य नवीन गुंतवणूकदारांना पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडण्यात आले. टार्गेट पूर्ण केल्यास महागडी घरे, आयलॉसहान गाड्या, बोनस, हॉलिडे मेंबरशीप आदींचे आमिष दाखविले. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारण्यात आली.

यासोबतच विनोद तुकाराम खुटे याने अन्य आरोपींच्या मदतीने 'फॉरेस्ट ट्रेडिंग'च्या नावाखाली 'काना कॅपिटल' नावाने नवीन कंपनी तयार केली. या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात आले. गुंतवणूकदारांशी 'झूम' तसेच 'ऑनलाईन' पद्धतीने संपर्क साधला. त्यांना सातत्याने परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. गुंतवणुकीचे पैसे उकळण्यासाठी बनावट फर्म तयार करण्यात आल्या. याकरिता तयार करण्यात आलेल्या पाच बनावट बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास गुंतवणूकदारांना भाग पाडण्यात आले. त्यानंतर काही दिवस या  लोकांना 'फॉरेस्ट ट्रेडिंग' करायला लावली. काही दिवसांनी अचानक 'काना कॅपिटल' या कंपनीचे कामकाज बंद करण्यात आले. विविध कंपन्या आणि बनावट खात्यांच्या माध्यमातून जमा झालेली १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकाची रक्कम हवाला रॅकेटच्या माध्यमातून भारताबाहेर पळविण्यात आली.

यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जून महिन्यात पुणे आणि अहमदनगरमधील 'व्हीआयपीएस ग्रुप' आणि 'ग्लोबल एफिलिएट बिझनेस'च्या केंद्रांवर छापे टाकले होते. 'ईडी'ने केलेल्या कारवाईत परककीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा)अंतर्गत  १८ कोटी ५८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या सर्व घोटाळ्याचा 'मास्टरमाइंड' विनोद खूटे हा आहे. तो हे सर्व आर्थिक फसवणुकीचे रॅकेट दुबईमध्ये बसून चालवीत होता. त्याने हा सर्व व्यवसाय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे ग्लोबल एफिलिएट बिझनेसच्या नावाखाली चालविला आहे. मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला लावण्यात येत होते. या अॅप्लिकेशनद्वारेच पुढील सर्व व्यवहार केले जात असत. खुटे याने व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून विविध बेकायदेशीर व्यवहार, क्रिप्टो एक्स्चेंज आणि वॉलेट सर्व्हिसद्वारे हजारो गुंतवणूकदारांना गंडवले. या फसवणुकीच्या गोरखधंद्यात प्रामुख्याने ग्लोबल एफिलिएट बिझनेस ऑपरेशन. गुगल प्ले स्टोअर आणि अप्पल स्टोअरवर उपलब्ध असलेल्या 'ग्लोबल एफिलिएट बिझनेस' नावाच्या ऍप्लिकेशनद्वारे आर्थिक व्यवहार करण्यात आले. ग्लोबल एफिलिएट बिझनेसद्वारे अनधिकृतरित्या  मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) स्कीम चालविल्या जात होत्या.

विनोद खूटे याच्याशी संबंधित असलेल्या या सर्व कंपन्या अनधिकृत आणि फसव्या मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) योजना चालविण्याच्या गोरखधंद्यात अडकलेल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून आजवर करण्यात आलेल्या घोटाळ्याचा आकडा जवळपास १२५ कोटींच्या घरात आहे. हे सर्व पैसे हवाला रॅकेट आणि शेल कंपन्यांचा वापर करून देशाबाहेर पळविण्यात आल्याचे 'ईडी'च्या तपासात समोर आलेले आहे.

काना कॅपिटलच्या माध्यमातून फॉरेक्स, क्रिप्टो आणि स्टॉक ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज देखील दिले जात होते. काना कॅपिटलने व्हीआयपीएस ग्रुपच्या संचालकांच्या सहकार्याने ग्लोबल एफिलिएट बिझनेस क्लायंटसाठी साप्ताहिक प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन केलेले होते. त्यांना व्हीआयपीएस वॉलेटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. विनोद खुटे याने पुण्यामध्ये मेसर्स डी धनश्री मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू केली होती. याद्वारे देखील गुंतवणूकदारांना दोन ते चार टक्के मासिक व्याज देणार्‍या फसव्या योजनांसह भुरळ पाडली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest