महावितरणच्या २५ प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘पुणे’अव्वल
नागरिक, विद्यार्थी, विविध एजन्सीजचे कर्मचारी यांच्यासह महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रबोधन व जनजागृतीसाठी महावितरणच्या मुख्य प्रशिक्षण केंद्राने राज्यातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांचे सन २०२२-२३ मधील मानांकन नुकतेच जाहीर केले आहे. यात पुणे परिमंडळाच्या लघु प्रशिक्षण केंद्राने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
पुणे परिमंडलाच्या गणेशखिंड येथील लघु प्रशिक्षण केंद्राने गेल्या आर्थिक वर्षामध्ये एकूण ८८ प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून वर्ग एक ते चारमधील ४ हजार ९३० अभियंता, अधिकारी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच १८ हजार ३२० वीजग्राहक, शालेय व अभियांत्रिकी विद्यार्थी, अप्रेंटीस, सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन्स, मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी अशा एकूण २३ हजार २५० जणांना विविध विषयांवर प्रशिक्षण दिले आहे.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार व लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांच्या पुढाकाराने पुणे परिमंडळामध्ये विविध विषयांवरील प्रशिक्षणाला मोठा वेग देण्यात आला आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणून नाशिक येथील मुख्य प्रशिक्षण केंद्राने दिलेले लक्ष्य पुणे परिमंडळाने तब्बल १९७ टक्क्यांनी पूर्ण करीत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.