पुण्यातील दुचाकी चोरणारी टोळी गजाआड
पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून तब्बल १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच १७ आरोपींना अटक केली आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी मार्च २०२३ पासून गुन्हे शाखेतील पोलीस आयुक्तांकडून विशेष मोहीम राबवली जात होती.
दुचाकी चोरणारी टोळी पुण्यातील दुचाकी चोरून लातूर, धाराशिव, बीड परिसरात विक्री करत होते. शहरातील पार्किगमध्ये लावलेल्या दुचाकीचे हँडल लॉक तोडून दुचाकी पळवायचे. त्यानंतर लातून, धाराशिव, बीड शहरातील नागरिकांना विकायचे. यावेळी फायनान्स कंपनीने दुचाकी ओढून आणली असल्याचे सांगून अर्ध्या किमतीत विकत असतं. त्यानंतर कागत्रच्यावेळी समोरच्या व्यक्तीची फसवणूक करत होते. अखेर या चोरट्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ५, ६, ४, २, आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोन यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १७ आरोपी व एक विधीसंघर्षीत बालक यांना पकडून तब्बल ५४,६७,००० रुपये किमतीचे एकूण १६२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये युनिट सहाकडून ३३ लाख ४० हजार किमतीची १०० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
तर युनिट पाचकडून ५ लाख ४० हजार किमतीची एकूण १४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. युनिट चारकडून ५ लाख ५५ हजार किमतीची नऊ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक दोन कडून ५ लाख ६७ हजार रुपये किमतीची २१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. युनिट दोनकडून ४ लाख ६५ किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १९ दुचाकी वाहने आहेत.