पुणेकरांना पडेना कोटींच्या बक्षिसांचीही भुरळ
विजय चव्हाण
पुणे महानगरपालिकेने यंदा पहिल्यांदाच प्रत्येक निवासी मिळकतीला करात ४० टक्के सवलत दिली असून, वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांवर एक कोटी रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली आहे. यामध्ये पाच पेट्रोल कार, पंधरा ई-बाईक, १५ मोबाईल फोन, लॅपटाॅप यांचा समावेश आहे. मात्र, एवढे उद्योग करूनही यंदा मिळकतकर भरण्यात पुणेकरांनी उदासीनताच दाखवली आहे. गेल्या १५ मे ते १० जुलै या कालावधीत १२ लाख २५ हजारांपैकी अवघ्या ४ लाख मिळकतींचा ७०१ कोटी ९६ लाख रूपये इतकाच कर जमा झाला आहे.
मागील वर्षी सवलतीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत ६ लाख ७३ हजार मिळकतधारकांनी १,१०२ कोटी रुपयांचा कर जमा केलेला होता. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत जवळपास ४० टक्के पुणेकरांनी अद्यापही कर भरलेला नाही. महापालिकेने मेसेज, सोशल मीडिया, ई-मेल, तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून जाहिराती करूनही कर भरला जात नसल्याचे चित्र आहे. सवलतीच्या दरात कर भरण्यासाठी पुणेकरांना ३१ जुलैपर्यंत मुदत आहे.
महापालिकने शासनाच्या आदेशानुसार २०१९ पासून निवासी मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द केली होती. त्यानंतर ही सवलत देण्यासाठी मार्च २०२३ मध्ये शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित होता. तो ३ एप्रिल रोजी मंजूर झाला. त्यामुळे महापालिकेने दरवर्षी १ एप्रिलपासून नागरिकांना दिली जाणारी मिळकतकराची बिले १५ मेपासून दिली. बिल भरण्यासाठी दोन महिने दिले जाते. पण, बिलांच्या गोंधळामुळे यंदा ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतरही संभ्रमाची स्थिती आहे. ४० टक्के सवलत रद्द केलेली जवळपास ४ लाख बिले असून, या बिलांमध्ये थकबाकीसह चालू वर्षाचा कर नमूद केला. त्यामुळे नागरिकांना चालू वर्षाचा कर भरायचा असून, थकबाकी रद्द होण्यासाठी पैसे भरताना 'पीटी-३’ हा अर्ज भरायचा आहे. लोकांमध्ये जनजागृती झाली, असली, तरी बिलात थकबाकी दिसत असल्याने नागरिक सगळीकडे केवळ चौकशीच करत आहेत. बिल भरायला गेलो, तर सर्व रक्कम भरावी लागेल असा समज झाल्याने अनेक नागरिक बिलच भरण्यास येत नसल्याचे चित्र आहे. अशी माहिती करसंकलन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सीविक मिररला दिली.
पाच पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल संच, १० लॅपटाॅप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना देण्यात येणार आहे. लाॅटरी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नसून, केवळ मिळकतकर ३१ जुलैपर्यंत भरणे आवश्यक आहे, अशी माहिती करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.